मतदार यादीत फोटो नसल्याने सदस्यांचा संताप! अमळनेर शिक्षण मंडळात खळबळ

अमळनेर : विक्की जाधव.
खान्देश शिक्षण मंडळ अमळनेर फेलो, पेट्रोल, डाईस पेट्रोल समाज सदस्यांच्या मतदार यादीत फोटो नसल्यानं मंडळात खळबळ उडाली आहे. खा. शी. मंडळाचे सदस्य प्रसाद रमेशचंद शर्मा यांनी मंडळाकडे लेखी निवेदन देत ही गंभीर बाब मांडली असून, “फोटोशिवाय मतदार यादी अपूर्ण आणि शंकेस्पद आहे” असा प्रश्न उपस्थित केला आहे.

३१ ऑक्टोबर रोजी एका दैनिकात प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत फोटो नसल्याचे स्पष्ट दिसत असून, याबाबत तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. श्री. शर्मा यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, २५ ऑगस्ट २०२५ रोजी फोटोसह मतदार यादी जमा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्यापही ते अमलात आणले गेले नाही.

फोटोशिवाय मतदार यादी प्रसिद्ध केल्याने अनेक सदस्यांमध्ये असंतोष पसरला असून, “फोटोसह यादी त्वरित प्रसिद्ध न झाल्यास ४ नोव्हेंबर रोजी आंदोलनाचा इशारा” देण्यात आला आहे. या निवेदनावर “खान्देश शिक्षण मंडळ फेलो अमळनेर” यांच्या शिक्क्यासह प्रसाद रमेशचंद शर्मा यांची स्वाक्षरी असून, मंडळाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.