अवघ्या चार तासांत अंमळनेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई सराईत आरोपी मोटरसायकलसह जेरबंद!
अमळनेर : विक्की जाधव.
वेगवान तपास आणि तात्काळ प्रतिसादाचे उत्तम उदाहरण देत, अंमळनेर पोलिसांनी अवघ्या चार तासांत चोरी गेलेली मोटरसायकल परत मिळवत सराईत चोरट्याला जेरबंद केले. ही कारवाई ९ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात आली असून, आरोपी धनंजय रवींद्र पाटील (रा. विद्यानगरी, देवपूर, धुळे) हा पूर्वीपासूनच वाहनचोरीसाठी कुप्रसिद्ध असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयपाल इंदरसिंग राजपूत (रा. गंणपूर, ता. चोपडा) हे आपल्या मित्रासह न्यायालयात कामानिमित्त आले होते. त्यांनी आपली एचएफ डिलक्स मोटरसायकल (क्र. MH 19 DP 4541) न्यायालयाजवळ पार्क केली होती. मात्र, अज्ञात व्यक्तीने मोटरसायकल चोरी केल्याने अंमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीनंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. समाधान गायकवाड व गुन्हे अन्वेषण पथकाने जलदगतीने तपास सुरू केला.फक्त चार तासांच्या आत पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्याला मोटरसायकलसह ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने न्यायालयात तारखेला आल्यानंतर मास्टर कीच्या सहाय्याने वाहन चोरी केल्याचे कबूल केले. यापूर्वीही या आरोपीने धरणगावहून बुलेट चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी श्री विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. निकम यांच्या आदेशाने करण्यात आली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार करीत आहेत.