सार्वजनिक धोरण विश्लेषणासाठी राज्यशास्त्र महत्वाचे – सीए नीरज अग्रवाल
अमळनेर : विक्की जाधव.
खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत) राज्यशास्त्र विभागाचा स्वागत समारंभ प्रताप तत्वज्ञान केंद्र, अमळनेर येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून खानदेश शिक्षण मंडळाचे कार्योपाध्यक्ष सीए नीरज अग्रवाल उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “राज्यशास्त्र विषय हा गृहीतकांची पडताळणी करणारा व सार्वजनिक धोरण विश्लेषणासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे” असे प्रतिपादन केले.
या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आफ्रिन पठाण, साक्षी पाटील, मयुरी पाटील, भाग्यश्री पाटील, स्वप्नील अमृतकर यांच्यासह SET परीक्षा उत्तीर्ण निर्भय सोनार व स्वप्नील अमृतकर यांना विशेष सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान तृप्ती सोनवणे, राजश्री पाटील व इतर विद्यार्थ्यांनी कौशल्य सादरीकरण केले.समारंभात प्रताप तत्वज्ञान केंद्राचे मानद संचालक डॉ. एस. डी. ओसवाल, सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. जयंत पटवर्धन, विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. धीरज वैष्णव यांनी विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित शिक्षण, दोन पदव्यांची संधी व तत्त्वज्ञान अभ्यासाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजय तुंटे यांनी राजकारण, करिअर आणि तत्त्वज्ञान अभ्यास यांची सांगड घालण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले.