शालार्थ आयडी घोटाळा : ६३२ शिक्षक व शिक्षणाधिकारी चौकशीत
मार्मिक न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी आता वेगाने सुरू झाली आहे. राज्यभरातील तब्बल ६३२ संशयित शिक्षक, मुख्याध्यापक व शाळा संचालकांवर कारवाईची टांगती तलवार असून, मंगळवारपासून सुनावणी प्रक्रिया प्रारंभ झाली आहे. पहिल्याच दिवशी ५० शिक्षकांना सुनावणीसाठी हजर राहावे लागले असून, त्यांच्या कागदपत्रांची काटेकोर छाननी करण्यात आली. शिक्षण आयुक्तांच्या आदेशानुसार उपसंचालक पातळीवर विशेष समितीद्वारे सुनावणी होणार आहे.
सायबर पोलिसांनी आधीच या घोटाळ्यात गुन्हा दाखल केला असून, अनेकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे नियुक्त्या मिळवून वेतन उकळल्याचा संशय व्यक्त होत आहे. यापुढील सुनावणीत दोषी सिद्ध झालेल्यांची नियुक्ती रद्द होण्याची शक्यता असून, संपूर्ण प्रक्रियेस १२ ते १५ दिवसांचा अवधी लागणार आहे. या घोटाळ्यामुळे शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता व विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा आणि अमळनेर तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर चौकशी होणार आहे. अनेक शिक्षक व शिक्षणाधिकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकले असून, त्यांच्या कारकिर्दीवर संकटाचे ढग दाटले आहेत. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी होत आहे.