बादरपूरमध्ये पोलिसांचा धडाकेबाज छापा – 40 लाखांचा अवैध दारू व्यवसाय उध्वस्त.
मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव.
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी घेतलेली कडक भूमिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पारोळा तालुक्यातील बादरपूर गावाजवळ बोरी नदीच्या काठावर सुरू असलेल्या अवैध दारू निर्मितीच्या कारखान्यावर पोलिसांनी बुधवारी मोठा छापा टाकला. या कारवाईत तब्बल ₹40 लाख 33 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अवैध धंदा करणाऱ्या तिघांना पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक सचिन सनम यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने ही कारवाई राबवली. पत्र्याच्या शेडमध्ये गुपचूप सुरू असलेला हा कारखाना मोठ्या प्रमाणावर गावोगावी अवैध दारू पुरवठा करत असल्याची माहिती मिळाली होती. छाप्यात राकेश छगनलाल जैन, टीन्या डोंगरा पावरा आणि करतारसिंग गणेशसिंग पावरा यांना पकडण्यात आले. घटनास्थळावरून दारू तयार करण्याचे साहित्य, कच्चा माल, भट्टीसह इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही धडाकेबाज कारवाई झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अवैध दारूच्या धंद्याला मूक संमती देणाऱ्यांवर देखील कारवाई होणार का? असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेत आहे. पोलिसांच्या या कडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.