अमळनेर नगरपरिषदेचा गाळा लिलाव घोटाळा! गोरगरीब वंचित, ठेकेदार-प्रशासनावर संशयाचे सावट
अमळनेर : विक्की जाधव.
भाग – 2
टी.पी. नंबर-123 मधील A व B विंग या प्रकल्पातील नगरपरिषद अमळनेरने काढलेल्या ऑनलाईन गाळा लिलावात उघडकीस आलेल्या गैरव्यवहाराने शहरात संतापाची लाट उसळली आहे. ‘ब’ कॅटेगिरीची नगरपरिषद असूनही अव्वाच्या सव्वा दर लावून गोरगरीब व छोट्या व्यापाऱ्यांना लिलावातून हद्दपार करण्यात आले.
अनंत निकम, संजय युराज पाटील, शीतल पाटील व सुभाष जगदेव यांनी दाखल केलेल्या याचिकेत दोन रोड कॉर्नर दुकाने अनियमितपणे विकणे, मंजूर प्लॅन धाब्यावर बसवणे, FSI मध्ये हेराफेरी करणे अशा थरारक अनियमितता नमूद केल्या आहेत. हा प्रकार झाकण्यासाठी ठेकेदाराने जाणूनबुजून तोडफोड सुरू केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांनी केला.

“निकाल लागेपर्यंत व्यापाऱ्यांनी पैसे भरणे टाळावे. मंजूर प्लॅनला हरताळ फासून नगरपरिषद, मुख्याधिकारी आणि ठेकेदार यांचा संगनमताचा डाव असल्याशिवाय एवढी मोठी अनियमितता शक्यच नाही,” असा थेट आरोप निकम यांनी केला आहे.
साईट व्हिजिट दरम्यान अधिकारी झोपा काढत होते का? ठेकेदाराला मोकळे रान का मिळाले? मोठ्या आर्थिक देवाण-घेवाणीशिवाय हे कसे शक्य आहे? असे प्रश्न उपस्थित होत असून संपूर्ण अमळनेरात या लिलाव घोटाळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
भाग – 3 पुढे