होय.. पाडळसरे धरण PIB मान्यता ही आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नामुळेच मिळाली…?
अमळनेर : विक्की जाधव
तालुक्यातील बहुप्रतीक्षित पाडळसरे धरण प्रकल्पाला गुंतवणूक बोर्डाची (PIB) मान्यता मिळाल्याची माहिती नुकतीच आमदार अनिल पाटील यांच्या कार्यालयातून काही निवडक पत्रकारांना देण्यात आली. त्यानंतर त्यांचे समर्थकही धरणाच्या मंजुरीचे संपूर्ण श्रेय आमदार अनिल पाटील यांनाच जात असल्याचा जोरदार दावा करु लागले. मात्र, प्रत्यक्षात ही मान्यता नेमकी कुणाच्या प्रयत्नामुळे मिळाली?, यावरून सध्या जोरदार श्रेयवाद रंगला आहे.
याच संदर्भात ‘मार्मिक’ने प्रकाशित केलेल्या बातमीनुसार, अद्याप PIB ची अंतिम मान्यता मिळालेली नसून केवळ प्राथमिक चर्चा व हालचाली सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचबरोबर, PBI च्या बैठकीपूर्वीच मान्यता मिळाल्याचे जाहीर करणे हे दिशाभूल करणारे ठरते, असे अनेक जाणकारांचं म्हणणं आहे. या संदर्भात अधिक खुलासा होऊन येत्या काही दिवसात चित्र स्पष्ट होईल असे ते म्हटले.
खासदार स्मिता वाघ यांचा दावा…
“गेल्या एक ते दिड वर्षापासून स्मिता ताईंनी सातत्याने मंत्रालयात आणि दिल्ली येथे पाडळसरे धरणासाठी पाठपुरावा केला आहे. याचे लेखी पुरावे आहेत. PBI च्या बैठकीसाठी प्रस्ताव ठेवण्याच्या हालचाली त्यांच्याच माध्यमातून गती घेत गेल्या.” जिल्ह्याच्याहिताचे केंद्रात होणारे प्रत्येक काम हे खासदारांमार्फतच होतात हे सांगण्याची गरज नाही.
अनिल पाटील गटाची भूमिका…
(यासंदर्भात. आमदार अनिल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.)
दुसरीकडे, आमदार अनिल दादा पाटील यांचे कार्यकर्ते म्हणतात की,
“अनिल दादांनी मंत्री असतानाच या प्रस्तावाला गती दिली होती. मिळालेल्या सुप्रमा त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच आज धरणासंदर्भात पुढाकार घेतला गेला. मान्यता मिळवून देण्यात त्यांचीच भूमिका निर्णायक आहे.”
तरीही, या मान्यतेसंदर्भात कोणतेही अधिकृत पत्रक प्रकाशित करण्यात आलेले नाही, आणि जाहीरपत्राच्या आधीच सोशल मीडियावर “धरणास PIB ची मंजूरी” असा जयघोष करणारे संदेश फिरवले जात आहेत, यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
राजकारण आणि निवडणुकीचा गंध…
तालुक्यातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार,
“ज्या गतीने सध्या श्रेय लाटण्याचा खेळ रंगतोय, त्यावरून हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाललेले राजकारण वाटते. अमळनेरच्या इतिहासात धरण हा मुद्दा नेहमी निवडणुकीच्या तोंडावरच आठवला जातो, पुढे नगरपालिका निवडणुका लागण्याची दाट शक्यता आहे. हे आता नवे राहिले नाही.” म्हणून सामान्य जनतेला या विषयाची एवढी गंभीरता वाटत नाही.
ज्येष्ठांचा अप्रत्यक्ष टोला…
माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील, कृषीभूषण साहेबराव पाटील आणि शिरीष चौधरी यांच्या योगदानाकडेही दुर्लक्ष होत आहे, याची चर्चा आहे.
“तुम्ही लोकप्रतिनिधी आहात म्हणजे पाठपुरावा केला हे गृहित धरले जातेच, पण ‘मीच सर्व करता-धरता’ हा अहंकार जनतेला पटत नाही. आपण सेवक आहोत हे विसरू नका,” असा अप्रत्यक्ष टोला एका ज्येष्ठ नेत्याने मारल्याचे वृत्त आहे.
थोडक्यात निष्कर्ष :
पाडळसरे धरणाची PIB मान्यता ही अध्यप निश्चित स्वरूपात मिळालेली नाही, तरीही दोन्ही नेत्यांनी त्यासाठी प्रयत्न केल्याचे स्पष्ट होते. मात्र या विषयावर राजकीय श्रेयासाठी सुरू असलेली स्पर्धा, मुख्य मुद्दा म्हणजे धरणाचा विकास मागे आणि बॅनरचे -राजकारण पुढे अशी परिस्थिती दिसत आहे.
तालुक्याच्या जनतेची एकच अपेक्षा :
“धरणाच्या मंजुरीचा खेळ थांबवा आणि कामाला सुरुवात करा!” धरण पूर्ण झाले तर तालुक्यातील शेतकरी आणि सामान्य जनता तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही.
धरण संघर्ष समितीचा इशारा
या संपूर्ण प्रकल्पाच्या मागे धरण संघर्ष समितीचा सातत्यपूर्ण आणि ठाम पाठपुरावादेखील महत्त्वाचा ठरतो. सन्माननीय आमदार आणि खासदार यांनी पाठपुरावा केला यात दुमत नाहीच. परंतु या समितीने मागील अनेक वर्षांपासून राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांमध्ये पत्रव्यवहार करत धरणाच्या मंजुरीसाठी संघर्ष केला आहे. विशेष म्हणजे, या संघर्ष समितीतील काही प्रमुख कार्यकर्ते हे पूर्वी विद्यमान खासदारांचे निकटवर्तीय होते, यामुळे त्यांच्या भूमिकेला वेगळं वजन आहे.
काही वर्षापूर्वी या कार्यकर्त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला होता की,
“जर लवकरात लवकर पाडळसरे धरणाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली नाही, तर पुढाऱ्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा. अन्यथा धरण संघर्ष समिती दांडूका घेऊनही जनतेच्या हक्काचं काम करून घेण्यास मागे-पुढे पाहणार नाही!” अशीही ख्याती धरण संघर्ष समितीची आहे. असे ठणकावून सांगणारे सुभाष मामा. यांच्यासोबतही मार्मिक हितगुच केली.
यावेळी विद्यमान आमदार अनिल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची बाजू मांडताना, आमदार अनिल पाटलांनी वेळोवेळी केलेल्या कामाचा लेखाजोखा मार्मिक समोर मांडला.
पत्रकार विक्की जाधव -9175050300
भाग 3 लवकरच..