करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- करमाळा शहरामधील किल्ला वेस येथील पुरातन व जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या खोलेश्वर महादेवाच्या नंदीची (सागवानी नंदीची) खांद्यावरून मिरवणुक आज सायंकाळी ५.५५ मिनिटांनी किल्ला वेस येथून निघणार आहे. सदर मिरवणुकीकरिता विविध बँड, बँजो तसेच लेझीम पथक सज्ज असून कल्पवृक्ष ग्रुप च्या वतीने लेझीम पथकाला टीशर्ट देण्यात आले आहेत.
श्री खोलेश्वर महादेवाच्या नंदीची खांद्यावरून मिरवणूक काढण्याची प्रथा ही प्राचीन काळापासून सुरू आहे. महाशिवरात्री झाल्यानंतर येणाऱ्या आमावस्येच्या नंतर येणाऱ्या फाल्गुन शुक्ल तृतीया दिवशी नंदीची मिरवणुक काढली जाते. नंदीची मिरवणूक काढण्यामागे एक विशिष्ट प्रयोजन मानले जाते. नंदी हे महादेवाचे वाहन असून निसर्ग चक्र सुरळीत रहावे, मुबलक पाऊस पाणी मिळो तसेच शेती मध्ये भरपूर धनधान्य पिकावे याकरिता नंदीच्या वतीने महादेवाला साकडे घातल्यास वरील सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा असल्याने नंदीची विधिवत पूजा करून सन १९१५ पासून मिरवणूक काढली जाते. सदरची मिरवणूक पूर्वी रात्री १२:०० वाजता काढण्यात येत असे परंतु शासनाच्या नियमानुसार व कायद्याच्या अनुषंगाने मिरवणूक सायंकाळी ५:५५ मिनिटांनी सुरू करून रात्री १०:०० वाजेपर्यंत संपवली जाते.
तसेच पूर्वीच्या नंदीच्या मिरवणुकीत महात्मा गांधी विद्यालयाजवळ जामखेड, तेरखेड व करमाळ्यातील चिवटे या फटका व्यावसायिकांकडून शोभेची दारू (फटाके) उडविले जात असे.
पूर्वी सन १९१५ साली शेणा मातीचा नंदी होता त्याच शेणा मातीच्या नंदीला कापड गुंडाळून त्याची खांद्यावरून मिरवणूक काढली जायची. सदरचा नंदी हा आताचे तलाठी कार्यालय व पूर्वीचे गावठाण म्हणून उल्लेख असलेल्या किल्ला वेस येथील ठिकाणी असायचा.
कालांतराने शेणा मातीच्या नंदीची जागा लाकडी सागवानी नंदीने सन १९६६ साली घेतली. नव्याने तयार केलेला हा लाकडी नंदी वजनाने खूप जड होता परंतु त्या काळातील लोक हे शारीरिक दृष्ट्या सक्षम असल्याने जास्तीचे वजनही सहज उचलू शकत होते. परंतु कालांतराने लोकांच्या खानपानात बदल होत गेला आणि हळूहळू त्यांचे शारीरिक स्वास्थ्य ही ढासळू लागले त्यामुळे मंदिर समितीने सन १९९२ साली तोच नंदी ट्रॅक्टरमध्ये मिरवणुकीसाठी काढला परंतु भाविकांच्या श्रध्देचा विचार करता मंदिर समितीने सन २०१३ साली नंदीच्या वजनात घट केली व नवीन नंदीची मिरवणूक पुन्हा खांद्यावरून काढण्याची प्रथा चालू ठेवली परंतु प्राचीन प्रथा बंद पडू दिली नाही हे विशेष आहे. या पूर्वीचा सन १९६६ साली बनविलेला व वजनाने जड असलेला नंदी हा गणेशोत्सव कालावधीत विसर्जना दिवशी बाहेर काढला जातो व त्यावरूनच गणेशाची विसर्जन मिरवणूक काढली जाते.
या जागृत खोलेश्वर मंदिरातील पूजा विधी देवस्थानचे पुजारी नागेश लक्ष्मण काळे (गुरव) यांच्या अनेक जुन्या पिढींपासून करण्यात येते.
सदरची मिरवणुक पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित असतात तसेच मिरवणुक मार्गावरील घरांसमोर सुहासिनी सडा रांगोळी घालून नंदीचे स्वागत करतात.