June 29, 2025 7:53 am

शिवसेना संघटना ते राजकिय पक्ष…..

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिवसेना संघटना ते राजकिय पक्ष….
शिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ साली झाली. मराठी माणसांची एकजूट असावी व अन्याया विरोधात आवाज उठवून उपऱ्यांची दादागिरी नष्ट करण्याच्या हेतूने शिवसेना या संघटनेची स्थापना प्रबोधनकार ठाकरेंच्या आशिर्वादाने १९ जून १९६६ रोजी करण्यात आली. शिवसेना हे नावही प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांनीच सूचवले होते. तत्पुर्वी जागतिक किर्तीचे व्यंगचित्रकार असलेल्या बाळ ठाकरे यांनी आपल्या मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकातून शाब्दिक व व्यंगचित्रांतून फटकारे ओढत परप्रांतियांविरोधात वातावरण निर्मिती करून मरगळलेल्या मराठी मनाच्या निखा-यांवर फुंकर मारण्याचे काम केले होते. परप्रांतियांच्या नोकरभरती ची यादी प्रसिद्ध करून “वाचा आणि गप्प बसा” ही मालिका सुरू केली. त्यामुळे मराठी मनं पेटून उठली व ते एक आणा वर्गणी भरून सभासद होऊ लागले. वाढता प्रतिसाद पाहून या लोकांना एकत्र गुंफण्यासाठी एक संघटना काढण्याचा सल्ला प्रबोधनकारांनी बाळासाहेबांना दिला व या आधीच नमुद केल्या प्रमाणे शिवसेना या संघटनेची स्थापना करणात आली. शिवसेना प्रमुख म्हणून बाळ ठाकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पुढे बाळ ठाकरे यांना जनतेनेच बाळासाहेब असे सन्मान जनक नामाभिधान बहाल केले व ते बाळ ठाकरेचे बाळासाहेब ठाकरे झाले परंतू मार्मिक असो वा सामनामध्ये ते स्वतः च्या नावाचा उल्लेख बाळ ठाकरे असाच करीत.
मराठी माणसांची संघटना म्हणून शिवसेना नावारूपास येत असताना तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे शिवसेनेची पाठराखण करीत असल्याने विरोधक शिवसेनेचा उल्लेख “वसंत सेना” असा उपरोधाने करीत असत.
मराठ्यांतील सर्व जातींतील भेदभाव गाडून मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी झगडणारी लढाऊ संघटना म्हणून शिवसेना नावारूपास आली. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण असे सुरूवातीस शिवसेनेचे धोरण होते. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंचा एकखांबी तंबू होता. ते सर्वेसर्वा होते. त्यांना शिवसेनेत फालतू लोकशाही मान्य नव्हती. किंबहूना ते म्हणत माझ्या शिवसेनेत हुकुमशाही आहे.बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना आपल्या पद्धतीने वाढवली. त्यांचा एक नंबरचा शत्रू (लाल बावटावाले) कम्युनिस्ट पक्ष होता.या पक्षाला संपवण्यासाठी भगवा गार्ड ही सज्ज झाला.कम्युनिस्ट नेते कृष्णा देसाई यांच्या हत्येनंतर कम्युनिस्टांना मोठा हादरा बसला. पोट निवडणूकीत परळ लालबाग मधुन वामनराव महाडिक निवडून आले त्याच वेळी लालबावट्याच्या जागी भगवा फडकला. या नंतरच शिवसेनेची पाळेमुळे घट्ट रोवली गेली व शिवसेनेला पहिला आमदार लाभला.वामनराव महाडिकांनी संस्कृत मध्ये शपथ घेऊन विधानसभेत शिवसेनेची छाप पाडली.
या काळात बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द अंतिम मानला जात होता. बाळासाहेबांचे धोरण तेच शिवसेनेचे तोरण मानले जात होते. बाळासाहेब शब्दांचे पक्के होते. एकदा बोलले की बोलले त्यांनी कधीच शब्द फिरवला नाही, बदलला नाही किंवा दिलगिरी व्यक्त केली नाही. राजकारणातील ते असे एकमेवद्वितीय असे नेते होते. बाबरी मशीद जेव्हा कारसेवकांनी पाडली तेव्हा सर्वांनी हात झटकले होते मात्र बाळासाहेब ठामपणे बोलले-” हे कृत्य माझ्या शिवसैनिकांनी केले असेल तर मला त्यांचा अभिमान आहे.” बाळासाहेबांना जातीवर आधारित आरक्षण मान्य नव्हते. ते आर्थिक निकषांवरच असले पाहिजे,उपाशी पोटाला जात नसते, किती सरळ व साधे तत्वज्ञान होते.
शिवसेना ही जोपर्यंत संघटना होती तो पर्यंत शिवसेनेत शिस्त होती शिवसेनेचा दरारा होता. याच अनुषंगाने बाळासाहेब बोलले होते की ज्या दिवशी माझ्या शिवसेनेची कॉन्ग्रेस होईल त्या दिवशी मी माझे दुकान बंद करून टाकेन. परंतू या वाक्याचा संदर्भ विरोधक चुकिच्या पद्धतीने घेऊ लागले. बाळासाहेबांचा कॉन्ग्रेस ला विरोध होता असा सोईस्कर अर्थ काढू लागले. मुख्यत: भाजपा व शिंदे गट हे गैरसमज पसरवण्यात अग्रेसर आहेत. ते हे विसरतात की शिवसेनेची स्थापना झाली ती कॉन्ग्रेसच्या राजवटीत व तिला वसंतराव नाईक यांचा पाठींबा होता.तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गाधी यांनी आणिबाणी जाहीर केल्यानंतर बाळासाहेबांनी दिल्लीत त्यांची भेट घेऊन पाठींबा जाहीर केला होता. जेव्हा कॉन्ग्रेस ला पाशवी बहुमत मिळाल्यावर हा विजय “शाईचा नव्हे तर बाईचा” असे ठणकावणारेही बाळासाहेबच होतो. शरद पवार पंतप्रधान होत असतील तर आमचा त्यांना पाठीॅबा असेल असे बोलणारे किंवा प्रतिभाताई पाटील यांचे नांव कॉन्ग्रेसने सूचवले तेव्हा महाराष्ट्र कन्या राष्ट्रपती होत असल्याने पाठींबा जाहिर केला होता.
काही वेळेस कॉंग्रेससोबत युतीही केली होती. बाळासाहेबांना जे मराठी माणूस व महाराष्ट्र हिताचे वाटे त्यास ते कोणाचीही पर्वा न करता पाठींबा देत.
कालांतराने ८० टक्के समाजकारण मागे पडून राजकारणाचे प्रमाण वाढत गेले. मराठी माणसांना न्याय हक्क मिळवून द्यायचा असेल तर न्यायपालिकेत आपले जास्तीत जास्त प्रतिनिधी असले पाहिजेत ,हा मतप्रवाह जोर धरू लागला व शिवसेना ही संघटना हळूहळू राजकिय पक्ष झाली.संघटनेची शिस्त व दरारा कमी होण्यास राजकिय तडजोडी व डावपेच कारणीभूत ठरू लागले.आयाराम गयाराम प्रवृत्ती वाढू लागली. त्यामुळे ज्येष्ठ शिवसैनिक व पक्षांतर करून आलेल्यांत मतभेदाची दरी वाढु लागली. निष्ठे पेक्षा निवडून येण्याची क्षमता महत्वाची ठरू लागली.लौकिक अर्थाने शिवसेनेची कॉंग्रेस झाली. बाळासाहेबांना अशी शिवसेना अपेक्षित नव्हती.परंतू राजकीय पक्ष म्हणून आपले अस्तित्व व निवडणूक आयोगाची मान्यता टिकवण्यासाठी तडजोडी कराव्या लागल्या व त्याची सुरूवात बाळासाहेबांच्या हयातीतच झाली. भाजपा या पक्षाशी युती व युतीतून मिळालेली सत्ता असे चक्र सुरु झाले. बाळासाहेबांच्या महापरिनिर्वाणा नंतर शिवसेनेत दबा धरून बसलेल्या अतिमहत्वाकांक्षी नेत्यांनी डाव साधला व अभेद्य समजली जाणारी शिवसेना भंगू लागली. आपण मनाची कितीही समजूत घातली की कोणीही गेले तर फरक पडत नाही, तरी पक्षाची हानी होतेच. कारण घर का भेदी लंका ढाये ! घरभेदीच जास्त धोकादायक असतात कारण आपणच त्यांच्यावर विश्वास ठेऊन आपली गुपितं,आपली शक्तिस्थळं व कमकुवत बाजू उघड केलेली असते.त्याचा ते आपल्या राजकिय स्वार्थासाठी वापर गैरवापर करतात. त्यामुळे आपली माणसं दूरावणार नाहीत याची दक्षता प्रत्येक धोरणी राजकारणी घेत असतो. माणसं फुटत गेली की पक्षाची शक्ति आटत जाते. जिथे समुद्रही ओहोटीत आटतो तिथे पक्षाची काय गत होईल ? याचा विचार झाला पाहिजे.
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
९८२२९०२४७०

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!