वैराग्यमूर्ती श्री संत गाडगेबाबांचा ६८ वा पुण्यतिथी महोत्सव विविध सेवाभावी उपक्रमातून संपन्न.
विश्वस्त बापूसाहेब देशमुख यांच्या प्रमुख मार्गदर्शनात यशस्वी आयोजन.
अखिल विश्वाला दशसूत्रीतून महानतेचा संदेश देणारे “निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचा ६८ वा पुण्यतिथी महोत्सव”लाखो भविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री गाडगेबाबा समाधी स्थळ, संत गाडगेबाबा नगर अमरावती येथे पुण्यतिथी महोत्सवात विविध सेवाभावी उपक्रम अतिशय सुनियोजनातून पार पडले.
या पुण्यतिथी सेवा सप्ताहात संस्थेचे प्रमुख विश्वस्त बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनात सागर देशमुख व्यवस्थापक प्रकाश महात्मे यांच्या आयोजनातून दिनांक 14 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान भजन-कीर्तन-हरिनाम, स्वच्छता अभियान,कुष्ठरोगी बांधवांचे अभ्यंगस्नान,तसेच गरजूंना भव्य-दिव्य स्वरूपात अन्नदान-वस्त्रदान करण्यात आले.
विशेषतः या पुण्यतिथी महोत्सवातील अतिशय महत्त्वाचा भाग असलेला, श्री बाबांचा पुण्यस्मरण व श्रद्धांजली अर्पण सोहळा शुक्रवार दिनांक २० डिसेंबर रोजी १२:२० मिनिटांनी हजारो अनुयायांच्या उपस्थितीत पार पडला.
शनिवारी समारोपीय कार्यक्रमात संस्थेचे विश्वस्त बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनात गाडगेनगर येथील समाधी मंदिर परिसरात महाशोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या शोभायात्रेत नागरवाडी येथील आश्रम शाळेचे विद्यार्थी कर्मचारी तसेच एकूण २१ महिला भजन मंडळी, ढोल भजन मंडळी आदींसह श्री बाबांचे हजारो अनुयायी या शोभायात्रेत सामील झाले होते.
यानंतर ह.भ.प. संदीप महाराज गिरी यांचे काल्याचे किर्तन तसेच प्रा. डॉ.अरविंदजी देशमुख यांच्या अमृततुल्य वाणीतून संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर प्रबोधन झाले. यावेळी प्रामुख्याने “संत गाडगेबाबा समाज प्रबोधन पुरस्कार” वितरण स्व. दादासाहेब देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संत गाडगेबाबांच्या दशसूत्रीला अंगीकारत खऱ्या अर्थाने समाजसेवेच्या विशेष कार्याबद्दल यावर्षीचा संत गाडगेबाबा समाज प्रबोधन पुरस्कार मुंबई येथील उदार दयाळू सीतादेवी संतोषकुमारजी झुनझुनवाला वतीने संजय भैय्या झुनझुनवाला मुंबई यांना संस्थेचे विश्वस्त बापूसाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते प्रदान करत त्यांना सन्मानित करण्यात आले. संपूर्ण झुनझुनवाला परिवाराचे वैराग्यमूर्ती गाडगे महाराजांच्या सेवाकार्यात गोरगरीब आदिवासी तसेच गौसेवेसाठी विशेष सहकार्य आहे. या सेवाभावी कार्याची खऱ्या अर्थाने दखल घेत, श्री गाडगे महाराज मिशनचे उपाध्यक्ष तथा श्री गाडगे महाराज संस्थेचे प्रमुख विश्वस्त नागरवाडी इंद्रभुवणाचे शिल्पकार बापूसाहेब देशमुख यांनी यावर्षीच्या संत गाडगेबाबा समाज प्रबोधन पुरस्काराकरिता श्रीमती सीतादेवी संतोषकुमारजी झुनझुनवाला यांची या पुरस्काराकरीता निवड करण्यात आली होती.
दरम्यान शोभा यात्रेमधील भजनी मंडळ व सेवकांना उबदार ब्लॅंकेट व जीवनावश्यक साहित्य भेट स्वरूपात देत त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
सरते शेवटी अमरावती नगरीतील हजारो भाविक-भक्तांनी महाप्रसादाचा यावेळी लाभ घेतला.
प्रामुख्याने या कार्यक्रमाला मुंबई येथील संजय भैय्या झुनझुनवाला, दानवीर नितीन दळवी, व्यवस्थापक प्रकाश महात्मे, कर्करोग रुग्णसेवक प्रशांत देशमुख, संचालक सागर देशमुख,समाज प्रबोधनकार भरत महाराज रेळे, प्रा.डॉ. अरविंदजी देशमुख, सुखदेवशेठ भुतडा, व्यवस्थापक वसंतराव देशमुख, ज्येष्ठ पत्रकार तथा संचालक गजानन देशमुख, पत्रकार मंगेश देशमुख, प्रसिद्ध कथावाचक सोपान महाराज सरोदे, प्रसिद्ध गायक अतुल रेळे, राहुल रेळे,माजी मुख्याध्यापक किशोर चौधरी, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.