जळगांव : जळगांव जिल्ह्यातील आरोग्यदूत रामेश्वर नाईक यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री साहाय्यता कक्षाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पाच वर्षांसाठी आहे. यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्यदूत नाईक यांचा सत्कार केला. आरोग्यदूत नाईक हे जळगांव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोद्री येथील मूळ रहिवासी असून, भाजपा नेते व माजीमंत्री आ. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यासह राज्यभरात आरोग्यदूत नाईक हे आरोग्यसेवा करीत आहेत. आमदार महाजन यांच्या मदतीने आरोग्यदूत नाईक यांनी ५० लाखांहून अधिक रुग्णांच्या उपचारासाठी मदत केली आहे. यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. नाईक यांनी आरोग्य तपासणी शिबिरे भरवून गोरगरीब, गरजूंना लाभ दिला आहे. आजपर्यंत त्यांच्याकडे मदतीसाठी गेलेली व्यक्ती निराश होऊन कधीच माघारी आलेली नसून, त्यांनी केलेल्या कार्याला बघूनच आज त्यांची ‘आरोग्यदूत’ म्हणून ओळख निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातच नव्हे; तर देशभर ते आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गरजू व गरीब रुग्णांना सहकार्य करीत असतात. आरोग्यदूत नाईक यांनी सांगितले की, विधी व न्यायमंत्री यांच्या कार्यालयाच्या धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा गरीब रुग्णांना उपलब्ध करून देणे व त्यावर देखरेख ठेवण्यासाठी राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष स्थापन करण्यात आला. त्या कक्षाचे प्रमुख म्हणून रामेश्वर नाईक हे कामकाज पाहत होते. आता मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाला धर्मादाय कक्षही जोडण्यात आला आहे.