विशाल पाटील, इतर कार्यकर्त्यांनी फक्त तुमच्या पालख्याच वहायच्या काय ?
दत्तकुमार खंडागळे संपादक वज्रधारी, मो. 9561551006
सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी जयश्री पाटील यांच्या प्रचारसभेत, “पक्ष सातत्याने आमच्यावर अन्याय करतोय !” असे म्हंटले आहे. ते लोकसभेत कॉंग्रेसचे सहयोगी सदस्य आहेत. सहयोगी सदस्य असले तरी ते सच्चे कॉंग्रेसी आहेत. अवघा जिल्हा त्यांच्याकडे कॉंग्रेसचे नेते म्हणूनच पाहतो. पण परवा त्यांनी पक्षाने दिलेल्या उमेदवाराला पाठबळ न देता घराण्याला महत्व देत कॉंग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्री पाटील यांना पाठींबा दिला. पक्षाच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली आहे. पक्षाच्या उमेदवाराविरूध्द ते प्रचाराला उभे राहिले आहेत. “सातत्याने दादा घराण्यावर अन्याय केला जातोय !” असा आरोपही त्यांनी यावेळी केला. आता या आरोपात कितपत तथ्य आहे हे आपण पाहूया. स्वर्गीय वसंतदादा हे एकेकाळी राज्याचे कॉंग्रेसचे मोठे नेते होते. राज्यात आमदारकीचे, खासदारकीचे तिकीट वाटप ते सांगलीतून करत असत. तेवढा त्यांचा दरारा होता, वकूब होता. कॉंग्रेसने दादांना चार वेळा मुख्यमंत्री केले. वसंतदादांना कॉंग्रेसने एकदा राज्यपालही केले. दादा मुख्यमंत्री असताना राज्यातली कॉंग्रेसही त्यांच्याच मुठीत होती. दादांंच्या पत्नी शालिनताई पाटील एकदा आमदार, एकदा खासदार व मंत्री राहिल्या होत्या. दादांचे चिरंजीव म्हणजे खासदार विशाल पाटलांचे वडील प्रकाशबापू पाटील हे ही पाचवेळा खासदार राहिले. मदन पाटील दोनदा खासदार झाले. एकदा आमदार व मंत्री झाले. त्यांच्यानंतर प्रतिक पाटील दोनवेळा खासदार झाले. केंद्रात त्यांनाही मंत्रीपद दिले. २०१४ ला त्यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली पण त्यांचा पराभव झाला होता. मदन पाटलांचे वडील विष्णू अण्णा पाटील एकदा आमदार राहिले होते. राज्य साखर संघ, राज्य बँक आणि नँशनल हेवीचे अध्यक्षही होते. त्यानंतर आता त्याच घरातले विशाल पाटील खासदार आहेत. नुकतेच त्यांना लोकांनी निवडूण दिले आहे. यावेळी त्यांना कॉंग्रेसची उमेदवारी नव्हती पण कॉंग्रेसी विचाराच्या मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनीच त्याना भरभरून मतं देत निवडूण आणलय हे सत्य आहे आणि हे सत्य त्यांना नाकारता येणार नाही. विशाल पाटील यांच्या आई श्रीमती शैलजा भाभी अनेक वर्षे कॉंग्रेसच्या जिल्हा कमिटीवर होत्या. प्रदेश कमिटीवरही होत्या. सध्या ज्या जयश्रीताईंनी बंडखोरी केली आहे त्या जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदी आल्या होत्या. दादा घराण्यातील लोकांना कॉंग्रेसने किंवा जनतेने दिलेली ही आजवरची संधी आहे. दादा घराण्यावर आजवर कॉंग्रेस पक्षाने आणि लोकांनी केलेला हा अन्याय आहे ? असा अन्याय सर्वांच्यावरच व्हायला हवा, एकट्या दादा घरावरच का ?
“पक्षाने आमच्या घरावर अन्याय केलाय किंवा पक्ष सातत्याने आमच्या घराण्यावर अन्याय करतोय !” असे खासदार विशाल पाटील म्हणत असतील तर असा अन्याय सर्वांच्यावरच व्हायला हवा. पक्षाने आजवर इतकी संधी देऊनही परत परत आम्हालाच आणि आमच्याच घरात संधी दिली पाहिजे असं जर विशाल पाटलांना वाटत असेल तर खेदाची बाब आहे. म्हणजे त्यांचे घराणे सोडून कुणीही कुठल्या पदावर येवू नये का ? इतर कुणीही आमदार-खासदार होवू नये का ? कॉंग्रेसमधल्या सामान्य कार्यकर्त्यांनी फक्त या लोकांच्या पालख्या वहायला हव्यात का ? “सत्तेची संधी फक्त आम्हालाच मिळाली पाहिजे, तो आमचाच हक्क आणि अधिकार आहे, बाकीचे कार्यकर्ते म्हणजे आमचे निव्वळ गुलाम आहेत !” असं तर या लोकांना वाटत नाही का ? असा प्रश्न या निमित्ताने पडतो आहे. खरेतर खासदार विशाल पाटलांनी पृथ्वीराज पाटलांच्या मागे खुल्या दिलाने उभे रहायला हवे होते. विशाल पाटलांच्या तुलनेत पृथ्वीराज पाटील तसे सामान्य घरातले कार्यकर्ते. त्यांचे वडील पक्ष संघटणेत होते. गेली दहा वर्षे राज्यात व जिल्ह्यात भाजपाचे वादळ सुरू होते. या वादळात प्रतिक पाटील, विशाल पाटील भाजपात जाणार अशा चर्चा सुरू असतानाही पृथ्वीराज पाटील नावाचा माणूस हातात कॉंग्रेसचा झेंडा घेवून ठामपणे काम करतो आहे. पक्षाचा विचार आणि पक्ष जीवंत ठेवतो आहे. गेल्या दोन वेळेला ते सांगली विधानसभा मतदारसंघातून लढले. त्यांच्या विरोधात पक्षातूनच कारस्थानं केली गेली. तरीही ते थोडक्या मतांनी पडले. खरेतर मोदींची लाट सुरू असताना, प्रतिक पाटलांचा जबरा पराभव झालेला असतानाही पृथ्वीराज पाटील अगदी थोडक्या मतांनी पडले. ही त्यांच्या कामाची पोहोचपावती होती. दोनवेळा पराभव झाल्यानंतरही हा माणूस घरात बसला नाही. सातत्याने लोकांच्यात राहिला. लोकांची कामे करत राहिला. पक्ष आणि पक्षाचा किल्ला लढवत राहिला. अशा माणसाला आज संधी मिळाली होती. पक्षाने केलेल्या सर्व्हेक्षणात त्यांच्या नावाला जास्त पसंती होती. तेच निवडूण येण्याची शक्यता असतानाही केवळ “आमचं घर, आमच्यावर अन्याय” असं म्हणत विशाल पाटील जयश्री पाटलांना ताकद देत असतील, पक्षाशी दगाफटका करत असतील तर ही विचारांशी आणि त्यांना मत देणा-या सच्चा कॉंग्रेसी मतदारांशी प्रतारणा आहे. विशाल पाटलांना खरंच सदसदविवेक बुध्दी असेल, ते पक्षाचा विचार, लोकशाही आणि संविधान मानत असतील तर स्वत:च्या छातीवर हात ठेवून त्यांनी सांगावे की जयश्री पाटील खरोखरच आमदारकीच्या दावेदार आहेत का ? त्या लढल्या तर खरच गाडगीळांसमोर टिकतील का ? याची उत्तरं विशाल पाटलांनी विवेकाने द्यावीत. विशाल पाटलांनी जयश्रीताईंची समजूत घालत पृथ्वीराज पाटलांना ताकद दिली असती तर नक्कीच त्यांच्याबद्दल सर्वांना आदर वाटला असता. त्यांच्या अशा कृतीने पक्ष, पक्षाचा विचार आणि लोकांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास मोठा झाला असता. पण विशाल पाटलांना बाकी सगळ्यापेक्षा घराणेशाही मोठी वाटली. नातीगोती महत्वाची वाटली. पक्ष, विचार, निष्ठा, लोकशाही, कार्यकर्त्यांचे कष्ट यापेक्षा त्यांना घरातल्या माणसाला संधी असावी वाटते ही खेदाची बाब आहे.
जयश्री पाटील केवळ आमच्या घरातल्या आहेत, दादांच्या घरातल्या आहेत म्हणून संधी द्यायला हवी किंवा संधी फक्त आम्हालाच द्यायला हवी, हा विचार लोकशाहीच्या तत्वात बसतो काय ? याला संरजामी मानसिकता का म्हणू नये ? पक्षाचा विचार माणणारा, पक्षासाठी आजवर योगदान देणारा, सतत लोकांच्यात राहणारा, लोकांची कामे करणारा दुस-या घरातील एखादा कार्यकर्ता निवडूण देवू नये का ? पृथ्वीराज पाटील गेली दहा वर्षे आपला वेळ, पैसा खर्च करून पक्षाचे काम करत आहेत. त्यांची उमेदवारी मेरीटची नाही काय ? त्यांची उमेदवारी मेरीटची नाही आणि जयश्री पाटलांची उमेदवारी मेरीटची कशी आहे ? ते विशाल पाटलांनी अख्ख्या जिल्ह्याला सांगावे. पृथ्वीराज पाटील आणि जयश्री पाटील या दोघांचेही काम त्यांनी मांडावे. गेल्या दहा वर्षात कुणी पक्ष जीवंत ठेवला ? कुणी लोकांच्यात जाऊन काम केले ? याचा लेखाजोखा त्यांनी जरूर मांडावा. तुमच्याकडे पक्षातील इतर कार्यकर्त्यांना संधीच दिली जाणार नाही काय ? पिढ्यान-पिढ्या त्यांनी फक्त तुमच्या पालख्याच वहायच्या काय ? त्यांनी कधीच नेतृत्व करण्यासाठी पुढे येवू नये काय ? असे प्रश्न या निमित्ताने पडतात. विशाल पाटील वेगळे वाटतात म्हणण्यापेक्षा वेगळे वाटत होते असं म्हणायची वेळ येऊ नये. पक्ष आणि पदं कुणाच्याच सातबा-यावरची मालमत्ता नाही. जो काम करतो, राबतो त्याचा हक्क मान्य व्हायला हवा. मग त्याला वारसा असो किंवा नसो. लोकशाहीत हेच अपेक्षीत आहे. दिल्लीत खासदारकीची शपथ घेताना “जय संविधान !” अशी घोषणा देणा-या विशाल पाटलांना याचा विसर पडावा हे दु:खद आहे.