बिबट्या येताच ‘एआय’चे सायरन वाजवणार, पुणे जिल्ह्यात राज्यातील आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा पहिला प्रयोग..
पुणे(विशेष प्रतिनिधी : वर्षा चव्हाण)
पुणे जिल्ह्यातील काही तालुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर बिबट्याचा वावर आहे. बिबट्याने मानवी वस्तीत घुसून केलेल्या हल्ल्यांमुळे पाळीव, प्राणी आणि मानवाचे मृत्यू झाले आहेत. आता बिबट्याच्या बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाच्या जुन्नर विभागाने बिबट्या ओळखण्यासाठी किंवा त्याचे वास्तव्य आहे की नाही ते समजण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (एआय) तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
एआयद्वारे कॅमेरा ट्रॅप लावून बिबट्याची माहिती समजवण्यासाठी ही प्रणाली विकसित केली आहे. या एआय प्रणालीमुळे ५०० मीटरच्या परिसरातील बिबट्या किंवा इतर प्राण्यांचे छायाचित्र त्यात कैद होणार आहे. केवळ बिबट्या समोर आला तरच सायरन वाजणार आहे. इतर प्राणी आल्यावर सायरन वाजणार नाही.
प्रणाली विकसित करण्यासाठी जंगल परिसरात उच्च गुणवत्तेचे कॅमेरे आणि सेन्सर्स बसवले जाणार आहेत. हे कॅमेरे बिबट्याच्या हालचाली टिपून तो डेटा एआयकडे पाठवणार आहे. एआय अल्गोरिदमचा वापर करुन बिबट्याची ओळख पटवली जाईल. बिबट्या दिसल्यास त्याची माहिती स्थानिक प्रशासनाला त्वरित दिली जाईल.