परतीच्या पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान
भरपाईची सपना मेश्राम यांची मागणी
रजत डेकाटे- प्रतिनिधी
उमरेड :- मागील चार दिवसांपासून अधून मधून कोसळत असलेल्या परतीच्या पावसामुळे सोयाबीन, धान यासह अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी इंजि. सपना मेश्राम यांनी केली.
एका शिष्टमंडळाच्या माध्यमातून सदर मागणीचे निवेदन गुरुवारी तहसील कार्यालयाला देण्यात आले. मागील चार दिवसांपासून सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाने उमरेड, भिवापूर, कुही तालुक्यातील सोयाबीन, धान व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवल्या गेला आहे. झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करुन देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.
यासोबतच प्रधान मंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी काढलेल्या पिक विम्याची रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, सोयाबीन पिकाला हेक्टरी दहा हजार तर कापसाला बारा हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्यात यावा, शेतकऱ्यांना शेतात जाण्या येण्यासाठी त्रास दायक ठरलेल्या पांदण रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लावण्यात यावी. आदी मागण्या सपना मेश्राम यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाकडून करण्यात आल्या. यावेळी राजु मेश्राम, सुजित गेडाम, सुरेश गेडाम, आदिनाथ नानवटकर, संजय मेश्राम, पारस शंभरकर, रजत लिंगायत, अभिजित नानवटकर, योगेश सवाईमुल, त्रिवेन रामटेके, हिमांशू बहादुरे आदी उपस्थित होते.