अतिक्रमण काढायला गेलेल्या नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याना केली शिवीगाळ अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल.
अमळनेर : विक्की जाधव
शहरातील देशमुख वाडा परिसरात अतिक्रमण काढायला गेलेल्या नगरपरिषदेच्या पथकाला शिवीगाळ करत घरातील महिलांनी अंगावर डिझेल ओतून घेत स्वतःला जाळुन घेण्याची धमकी दिल्याने शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी अमळनेर पोलिसांत तक्रार देण्यात आली असून नगरपरिषदेचे अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नागराज भबुतमल चोरडिया यांनी अतिक्रमण केले असल्याने त्यांना नगरपरिषदेने गेल्या वर्षापासून सहा वेळा नोटीस बजावून ही अतिक्रमण न काढल्याने मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्यासह अतिक्रमण विभागाचे पथक व पोलीस कर्मचारी २४ रोजी सकाळी ११ वाजता नागराज चोरडिया यांचे अतिक्रमण काढायला गेले असता नागराज चोरडिया, त्यांची पत्नी इंदुमती चोरडिया, मुलगा प्रदीप चोरडिया, हेमेंद्र चोरडिया, चेतन चोरडिया, सून किरण चोरडिया, वनिता चोरडिया हे सर्व मिळून तुम्ही हे अतिक्रमण काढू शकत नाही असे ओरडत जोरजोरात शिवीगाळ करू लागले. तसेच इंदुमती चोरडिया यांनी स्वतच्या व सूनांच्या अंगावर डिझेल ओतून तुम्ही जर अतिक्रमण काढले तर जाळुन घेवू आणि तुमचे नाव टाकून देवू अशी धमकी दिली. यावेळी अतिक्रमण पथक अतिक्रमण न काढता परतले. शासकीय कामात अडथळा आणुन शिवीगाळ केल्याप्रकरणी अमळनेर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.