हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते पळसदेव व तरंगवाडी तलावाचे जल पूजन!
इंदापूर : प्रतिनिधी भगवान लोंढे. दि.4/9/24
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते खडकवासला कालव्यातील पाण्याने भरून घेण्यात आलेल्या पळसदेव व तरंगवाडी (ता. इंदापूर) येथील तलावातील पाण्याचे उत्साही वातावरणामध्ये जल पूजन बुधवारी (दि.4) करण्यात आले.
पळसदेव व तरंगवाडी परिसरातील शेतकरी व नागरिकांच्या दृष्टीने हे दोन्हीं तलाव महत्त्वाचे आहेत. या तलावाच्या पाण्यावरती अनेक गावच्या नळ पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. त्यामुळे या तलावासह इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्यावरील सर्व तलाव भरून घेणे संदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी सातत्याने आग्रही भूमिका घेतली व पाठपुरावा केला. त्यामुळे पळसदेव व तरंगवाडी तलावांमध्ये पाणीसाठा झाल्याने हर्षवर्धन पाटील यांनी आनंद व्यक्त केला. आगामी काळातही इंदापूर तालुक्यातील शेतीला पाणी कमी पडू दिले जाणार नाही, असेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. या जल पुजन कार्यक्रमास पळसदेव, तरंगवाडी परिसरातील पदाधिकारी, शेतकरी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व हितचिंतक उपस्थित होते. दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते भादलवाडी तलावातील पाण्याचे रविवारी जलपूजन करण्यात आले.