बारामतीत पत्रकार हल्ला प्रकरणी पत्रकार आक्रमक, पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी ..
बारामती ( सह – संपादक- संदिप आढाव)
बारामती तालुक्यातील पत्रकार नवनाथ बोरकर आणि त्यांच्या वयोवृद्ध आई- वडिलांवर सोमवारी ( ता. १) गावातील नागरिकांनी कट रचून आणि जमाव करून जिवघेणा हल्ला केला आहे. यात आई वडिल गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पत्रकार आणि त्याच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याने बारामतीतील पत्रकार संघटना आक्रमक झाली आहे. पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल व्हावा यासाठी बारामती विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांना व उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांना निवेदन दिले असून पोलिसांनी वेळीच योग्य न्याय न दिल्यास पत्रकार संघटना आंदोलनाचा पावित्रा घेणार आहे.
बारामती तालुक्यातील झारगडवाडीत पत्रकारासह त्यांच्या वयोवृद्द आई वडीलावर जिवघेणा हल्ला करण्यात आला आहे. पत्रकार नवनाथ बोरकर त्यांची आई इंदुबाई धनाजी बोरकर आणि वडील धनाजी माधव बोरकर हे साठ वर्षांपासून झारगडवाडी गावात राहत आहेत. त्यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याचा अनेक वर्षांपासून वाद आहे याबाबत वयोवृद्ध धनाजी माधव बोरकर यांनी आणि त्यांच्या मुलाने बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे यांच्याकडे घराकडे येणारा रस्ता अडवल्याबाबत अपील केले होते. या संदर्भात बारामतीचे तहसीलदार यांनी कागदपत्रे सर्व बाबी तपासून संबंधितांच्या बाजूने रस्ता खुला करण्याचा आदेश १ एफ्रिल २४ रोजी पारित केला आहे. याबाबत तहसीलदार यांनी पोलीस बंदोबस्त देण्याचे पत्र देखील पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. पंकज देशमुख यांना दिले आहे. मात्र दरम्यानच्या कालावधीत पत्रकार नवनाथ बोरकर हे रस्त्याच्या अनुषंगाने पोलिसात, महसुली प्रशासन यांच्याकडे न्याय मागत असून त्या संदर्भाने सातत्याने बातम्या करीत असल्या कारणाने शेजारी राहत असलेल्या आणि रस्ता अडविणाऱ्या नागरिकांनी अचानक जमाव जमवून पत्रकार नवनाथ बोरकर आणि त्यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला आहे सध्या नवनाथ बोरकर यांच्या कुटुंबीयांवर अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय शासकीय महाविध्यालायात उपचार सुरु आहेत. या संदर्भाने बारामतीतील पत्रकार संघ, ऑल इंडिया संपादक संघ, भारतीय पत्रकार संघ यांच्यावतीने बारामती विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांना आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्या बाबतचे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी पत्रकार सोमनाथ कवडे, तैनुर शेख, नवनाथ बोरकर, स्वप्नील कांबळे, वसंत मोरे, दीपक पडकर, विकास कोकरे, प्रशांत तुपे, स्वप्नील शिंदे, योगेश नालंदे, सागर सस्ते, संताराम घुमटकर, आदी पत्रकार उपस्थित होते.
कोट – निस्पक्षपणे तपास केला जाईल तसेच या प्रकरणात पत्रकार नवनाथ बोरकर यांना योग्य सहकार्य करण्याचे आश्वासन उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी निवेदन देण्यासाठी आलेल्या पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले.