बाबा आमटे यांच्या आनंदवन आश्रमात तरुणीचा खून चोपड्याचा तरुणांस अटक
अमळनेर : विक्की जाधव.
राज्यातील अनेक शहरात प्रेमप्रकरणाच्या माध्यमातून अनेक गुन्हेगारी घटना उघडकीस येत असतांना नुकतेच एक धक्कादायक प्रकार बाबा आमटे यांच्या आनंदवन आश्रमातून बाहेर आले आहे. प्रेमात दगा दिल्याच्या आरोपावरून प्रियकराने आपल्या प्रेयसीचा चाकूने वार करून खून केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील बाबा आमटे यांच्या आनंदवन आश्रमात बुधवारी रात्री घडली. पोलिसांनी २४ तासांत आरोपी समाधान माळी (रा. चोपडा, जि. जळगाव) याला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरती दिगंबर चंद्रवंशी (२४) असे मृत तरुणीचे नाव आहे. आनंदवनातील आश्रमात ती व तिचे आई-वडील राहत होते. २६ जूनला तिचे आई-वडील सेवाग्राम येथे काही कामानिमित्त गेले होते. याची माहिती समाधानला मिळाली.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात राहणारा समाधान हा स्वतःच्या उपचारासाठी आनंदवनात आला होता. तो उपचार घेत असताना केअर टेकरचे कामही करायचा. तिथेच समाधान व आरतीचे प्रेमसंबंध सुरू झाले होते. सहा महिने दोघे प्रेमात होते. नंतर आरतीने त्याला सोडून दुसऱ्याशी प्रेम केल्याचा त्याचा आरोप होता. बुधवारी रात्री त्याने तिच्या घरी येऊन तिच्याशी वाद घातला. तो सोबत चाकू घेऊन आला होता. वाद टोकाला गेल्यानंतर त्याने कशाचाही विचार न करता आरतीच्या गळ्यावर, हातावर चाकूने सपासप वार केले. अति रक्तस्राव झाल्याने आरती जागेवर कोसळली आणि तिचा मृत्यू झाला. रात्री ९ वाजेच्या सुमारास आरतीचे आई-वडील घरी आले असता बाथरूमजवळ रक्ताच्या थारोळ्यात आरतीचा मृतदेह पडलेला दिसला. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी नयोमी साटम व पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांनी अधिक माहिती मिळवत तंत्रज्ञान व ह्यूमन इंटेलिजन्सच्या आधारे २४ तासांच्या आत आरोपी समाधानला अटक केली.