टँकर भरायलाही पाणी मिळणार नाही, अशी सुपे तलावाची स्थिती; तातडीने पाणी सोडा…
– पाहणी करून लोकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर खा. सुळे यांची सरकारकडे मागणी…
बारामती (सह-संपादक संदिप आढाव)
सुपे तलावातील पाण्याची पातळी अत्यंत खाली गेली असून हे पाणी आटले तर टॅंकरसाठी देखील पाणी शिल्लक राहणार नाही अशी स्थिती आहे. येथे तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर आगामी काळात या भागात भीषण पाणीटंचाई जाणवू शकते. तरी शासन आणि प्रशासनाने सुपे आणि आजूबाजूच्या गावांचा विचार करुन किमान मानवतेच्या दृष्टिकोनातून तरी सुपे तलावात तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
खासदार सुळे यांनी काल (दि. २०) संध्याकाळी या तलावाला भेट देऊन पाहणी केली, तसेच स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. पाणी टंचाईमुळे हैराण झालेल्या नागरिकांच्या भावना अत्यंत तीव्र असून लवकरात लवकर या तलावात पाणी सोडण्याची गरज आहे, असे सुळे यांनी यावेळी सांगितले.
निवडणूका येत जात राहतील, प्रचार देखील होत राहील, पण त्यासाठी जनतेच्या पाणी प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नसेल तर हे अत्यंत दुर्दैवी आणि अक्षम्य आहे, असा हल्ला सुळे यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांवर चढवला. या तलावातून सुपेसह आसपासच्या परिसरातील १२ वाड्यांना पाणीपुरवठा केला जातो. सध्याची दुष्काळी अवस्था पाहता पाण्याचे वेळीच योग्य ते नियोजन यापूर्वीच होणे गरजेचे होते.
तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. ही स्थिती आणखी काही दिवस राहिली, तर टँकर भरण्यासाठी सुद्धा पाणी मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर या तलावात पाणी सोडावे, अशी मागणी त्यांनी केली.