करमाळा प्रतिनिधी – माढा लोकसभा ही दररोजच्या नवनवीन घडामोडीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. भाजपाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने इच्छुक असलेल्या मोहिते पाटील परिवाराने राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी हाती घेण्याचे संकेत दिल्याने या मतदार संघातील चुरस मोठी व पाहण्यासारखी होणार असल्याचे बोलले जात आहे.
भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यापासून मोहिते पाटील परिवाराने फारकत घेतल्याने कटयाकटयावर निंबाळकर व मोहिते पाटील यांच्या लढतीची चर्चा होत आहे. त्यामध्येच शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांनीही कुर्डूवाडी येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेत निंबाळकर यांच्यावरील नाराजी स्प्ष्टपणे बोलून दाखविली. त्यानंतर निंबाळकर यांनी सावंत यांची नाराजी दूर करण्यासाठी मागील आठवडयात आलेगांव कारखाना येथे बैठक घेतली. सदर बैठकीनंतर शिवसेनेतील सर्व अलबेल असल्याचे बोलले जात असतानाच आज करमाळयात माढा विभागाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी पुन्हा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. परंतु या बैठकीला करमाळा व माढा तालुक्यातील व शहरातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना चिवटे यांनी निमंत्रीत केले नसल्याने पक्षांतर्गत दुफळी दिसून आली. सदरच्या बैठकीबाबत खालील पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.
आजच्या बैठकीसाठी मला कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही. तसेच लोकसभेच्या अनुषंगाने ते स्वत: निर्णय घेत असल्याने त्यांना करमाळा व माढा तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आवश्यकता भासत नसल्याने ते करमाळा व माढा तालुका सोडून इतर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना निमंत्रीत करीत आहेत.
– अरविंद पवार, शिवसेना उपजिल्हा प्रमुख माढा विभाग
सदरची बैठक ही पक्षाची नसून खाजगी बैठक आहे. या बैठकीसाठी आम्हाला कोणतीही सुचना मिळालेली नाही तसेच कोणालाही निमंत्रीत केलेले नाही त्यामुळे आजच्या बैठकीचा आणि आमचा काहीएक संबंध नाही. शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजी सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महायुतीचेच काम करणार आहोत.
– प्रियांका गायकवाड, शिवसेना महिला तालुका प्रमुख, करमाळा
मी या बैठकीला शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक म्हणणार नाही. कारण आमच्या कोणत्याच पदाधिकाऱ्याला बैठकीसाठी बोलावले नाही जर करमाळा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनाच बैठकीसाठी बोलावले जात नसेल तर ही बैठक कोणत्या पदाधिकाऱ्यांची आहे ? त्यामुळे आम्ही सर्व पदाधिकारी सावंत सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महायुतीचे काम प्रमाणिकपणे करणार आहोत.
– दादासाहेब थोरात, शिवसेना उपतालुका प्रमुख करमाळा.
शिवसेनेचे आम्हीही प्रमुख पदाधिकारी असतानाही आम्हाला निमंत्रण नाही त्यामुळे ही खाजगी स्वरूपाची बैठक असल्याने आम्ही या बैठकीसाठी गेलेलो नाही परंतु करमाळा तालुका हा माढा लोकसभा मतदार संघात येत असल्याने व आम्ही पक्षाचे प्रामाणिक पदाधिकारी असल्याने सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचे काम जोमाने करू.
– सुभाष पाटील, शिवसेना उपतालुका प्रमुख, करमाळा.
माढा लोकसभेची बैठक जर करमाळयात होणार असेल आणि त्याबाबतची माहिती करमाळा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनाच दिली जाणार नसेल तर ही पक्षाची बैठक नसून वैयक्तिक फायद्याची बैठक म्हणावी लागेल.
– नागेश काळे, शिवसेना शहर प्रमुख, करमाळा
आजची बैठकीसाठी आमचे नेते सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांना जाणीवपूर्वक टाळले असून त्यांचा फोटोही चिवटे यांनी बॅनरवर लावलेला नाही. जर जिल्हा संपर्कप्रमुखांनाच डावलून बैठक होत असेल तर ही फक्त निंबाळकर यांचा खिसा रिकामा करून स्वत:चा खिसा भरण्यासाठी बैठक बोलावली आहे. कारण सावंत सर हे फक्त पक्ष निष्ठा जोपासणारे व्यक्तिमत्व आहे तसेच पक्षाचा आदेशानुसार काम करणारे नेते आहेत त्यामुळे जर सावंत सरांनी प्रामाणिकपणे काम करायला सांगितले तर यांचे निवडणूकीच्या काळातील आर्थिक लाभ घेण्याचे दुकान बंद होईल या भितीपोटी त्यांनी सावंत सरांना व पक्षाचे मनापासून काम करणाऱ्या शिवसैनिकांना या कार्यक्रमापासून दूर ठेवलेले आहे. तसेच गर्दी करण्यासाठी प्रति व्यक्ती रू. 200/- दिलेले असल्याचीही कुजबूज माझ्या कानी आलेली आहे.
– विशाल गायकवाड, युवा सेना शहर प्रमुख, करमाळा
वरील सर्व टीका टिपण्णी व प्रतिक्रियेवरून एकच लक्षात येत आहे की, करमाळा व माढा तालुक्यातील शिवसेनेत काहीही अलबेल नसून अंतर्गत दुफळी मोठया प्रमाणात आहे. परंतु अनुपस्थित पदाधिकारी मात्र पक्षाचा आदेश शिरसंवाद मानून महायुतीचे काम करणार असल्याचे बोलून दाखवत आहेत. त्यामुळे या अंतर्गत धुसफुशीवर वरिष्ठ या बाबत कोणता निर्णय घेतात व सर्वांना एकत्रित काम करण्याचा आदेश कधी देतात ? हे मात्र पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.