कर्जत तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
प्रतिनिधी.संदिप कायगुडे
कर्जत: तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून १६ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येतील, अशी माहिती निवासी नायब तहसीलदार महादेव कारंडे यांनी दिली. यासह तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या तीन रिक्त जागेवर देखील पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
निवडणूका जाहीर
कर्जत तालुक्यातील कुंभेफळ, खेड, गणेशवाडी, वायसेवाडी, करमणवाडी आणि औटेवाडी या सहा ग्रामपंचायतीची मुदत संपली होती. कालच वरील सहा ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानुसार १६ ते २० ऑक्टोबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असून प्राप्त उमेदवारी अर्जाची छाननी २३ ऑक्टोबरला होणार आहे. वैध उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत २५ ऑक्टोबर राहणार आहे.
६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी
५ नोव्हेंबरला वरील सर्व ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी संपन्न होत निकाल जाहीर करण्यात येईल, अशी माहिती कर्जतचे नायब तहसीलदार महादेव कारंडे यांनी दिली. यासह तालुक्यातील लोणी मसदपूर, दुधोडी आणि तळवडी या तिन्ही ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एक जागेची पोटनिवडणुक देखील जाहीर झाली आहे.