June 29, 2025 3:43 pm

शेटफळ-हवेलीच्या तलावामध्ये पाणी सोडण्याच्या कारणावरून श्रेयवादावरून कलगीतुरा रंगला

अपनी भाषा में पढ़े! Translate

शेटफळ-हवेलीच्या तलावामध्ये पाणी सोडण्याच्या कारणावरून श्रेयवादावरून कलगीतुरा रंगला

(निलेश गायकवाड )

माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रेय भरणे आणि माजी सहकारमंत्री, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये सातत्याने मतदारसंघातील विकासकामं, श्रेयवादावरून दावे -प्रतिदावे सुरू असतात. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. पाटील व भरणेंमध्ये आता इंदापूर तालुक्यातील शेटफळ-हवेलीच्या तलावामध्ये पाणी सोडण्याच्या कारणावरून श्रेयवादावरून कलगीतुरा रंगला आहे.

इंदापूर तालुक्यामध्ये शेटफळ तलाव आहे. तलावाची पाणी क्षमता ६४० दशलक्ष घनफूट आहे. सध्या इंदापूर तालुक्यासह जिल्ह्याला पावसाने ओढ दिली असल्यामुळे तालुक्यातील पाण्याचे तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत. शेटफळच्या तलावमध्ये अल्प पाणीसाठा आहे. तलावामध्ये पाणी सोडण्याच्या कारणावरून दत्तात्रेय भरणे व हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये श्रेयवाद सुरू आहे.

कालवा सल्लागार समितीची बैठक २ सप्टेंबर रोजी पुण्यामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. या बैठकीत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेटफळ तलावामध्ये पाणी सोडता येणार नसल्याची टिप्पणी तयार केली होती. मात्र, मी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये शेटफळ तलावामध्ये पाणी सोडण्याची आग्रही भूमिका घेतल्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नीरा डावा कालव्याचे खरिपासाठीचे पहिले आवर्तन २० सप्टेंबर रोजी संपल्यानंतर शेटफळ तलावामध्ये पाणी सोडण्याचा आदेश दिला होता, असे पाटील यांनी सांगितले.

मात्र, कालव्याचे आवर्तन लांबल्यामुळे रविवारी पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे २ सप्टेंबर रोजी कालवा सल्लागार समितीची बैठक महत्त्वाची होती. विद्यमान लोकप्रतिनिधींना वेळ नसल्यामुळे उपस्थित राहिले नव्हते. मात्र, मी आदेश दिल्यामुळे पाणी सोडणार असल्याच्या बातम्या देऊन पाणी सोडण्याचे श्रेय लाटत असल्याचा आरोप पाटील यांनी केला.

भरणे काय म्हणाले…?

आमदार दत्तात्रेय भरणे म्हणाले, मी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पाणी सोडण्याचा आदेश दिल्यामुळे सोमवारपासून अधिकाऱ्यांनी शेटफळ तलावात पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे. यानुसार येत्या सोमवारपासून डाव्या कालव्याद्वारे शेटफळ तलावात पाणी सोडले जाणार आहे. याचा फायदा तलावाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना होणार असल्याचे सांगितले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!