एक गुंडाचा जन्मदिन
होय ,आज एक गुंडाचा जन्मदिन आहे,ज्या गुंडाचा दरारा आज संपूर्ण महाराष्ट्रात वाढतो आहे.ज्याची तक्रार असूनही पोलीस ज्याला अटक करू शकली नाही,अटकेपासून दूर पळणारे,अटकेपूर्वी जामीन घेणारे आपण अनेक पाहिले असतील,पण ‘माझ्यावर गुन्हा दाखल करा मला अटक करा ‘ असे पोलिसांना सतत सांगूनही ज्याच्यावर तक्रार दाखल असूनही पोलिसांची त्याला पकडण्याची हिंमत झाली नाही, असा महागुंड,ज्याचा आज जन्मदिन.
जो गुंड अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आलेल्या संकटांना समोर गेला आहे.
अनेक मोठमोठ्या गुंडांना ज्याने नामोहरम केले आहे.
वयाची आणि परिस्थितीची तमा न बाळगता हा गुंड अनेक आघाडीवर समोर होता ,आजही राहत असतो.
ज्याने अतिशय दबंगांना धडा शिकवला आहे.ज्याच्या नावाने अनेक वाईट कर्म करणाऱ्यांचा थरकाप होतो.
अनेक सत्कर्मामध्ये जो पुढे असतो.
जे काही करतो ते मनापासून,ना कसला बडेजाव ना कसला आव.अगदी सर्वसामान्यांसारखा.
कोरोना काळात ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले आहे.
आपल्या वाढदिवसाचे औचित्त साधून ज्याने अनेक पडद्याआड गेलेल्यां कलाकारांना समोर आणून सामाजिक,आर्थिक सन्मान मिळवुन दिला आहे.त्यांचे आशीर्वाद सतत ज्याच्या पाठीशी आहेत.
अनेक गोरगरीबांचा भाऊ,अनेक निराधारांचा आधार.
स्वतःचा जन्मदिवस जो सतत वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा करत असतो.जन्मदिनाला कोणाकडून काही घेण्यापेक्षा देण्याकडे ज्याचा भर असतो. ज्याचा हात सतत पुढे असतो, घेण्यासाठी नाही तर देण्यासाठी.
त्याच्या या चांगुलपणामुळे त्याचा चाहता वर्ग सतत वाढत आहे.
ज्याने उल्हासनगर नगरपालिकेचे विरोधीपक्षनेतेपद आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनीं गाजवले आहे.ज्याच्या उपस्थितीमुळे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची भंबेरी उडताना अनेकांनी पाहिली आहे.अनेक नगरसेवक एक पंचवार्षिक दबंगगिरी करून गाजवतात,कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना वेठीस धरतात. सत्तेचा दुरुपयोग करून आपली पोळी भाजून घेतात, शहरातील अनधिकृत बांधकामांच्या तक्रारी करून आपला उदरनिर्वाह करतात,त्यांना त्यांची कारकीर्द संपल्यावर लोक विसरूनही जातात.ते काळाच्या महिमेत गुडूप होतात.पण ज्याचा पंचवीस वर्षांपूर्वीचा नगरसेवक असतानाचा दरारा आजही महापालिकेत कायम आहे.अशा या गुंडाचा जन्मदिन.
जे काम नगरसेवकांनी करायला पाहिजे ते काम जो सतत करत असतो,महापालिकेतील भ्रष्टाचार सतत खोदून बाहेर काढत असतो,ज्याला या कामासाठी त्याने निर्माण केलेले छुपे सोर्स मदत करत असतात.
पुराव्याशिवाय जो कधी बोलत नाही. त्यामुळे ज्याच्यावर अनेकांनी तक्रारी करण्याची भाषा केली पण त्याच्या खरेपणामुळे त्याच्यावर कोणी तक्रार करू शकले नाही. अनेकांनी त्याच्या विरुद्ध शड्डू ठोकले.पण ते पोकळ निघाले.
अनेक दबंग म्हणणाऱ्या अधिकाऱ्यांना ज्याने लेखणीच्या जोरावर घरी पाठवले.
महापालिकेतील अनेक भ्रष्टाचार ज्याने उघडकीस आणून महापालिकेचे करोडो रुपये वाचवले.
कोरोना काळात आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या पण प्रामाणिकपणे लेखनी चालवणाऱ्या पत्रकारांची चूल पेटवण्याचे पुण्य ज्याने पदरात पाडून घेतले.
अन्याय अत्याचार विरुद्ध समिती स्थापन करून ज्याने अनेक अनोखे आंदोलने आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत केले.
एखादा मुद्दा उचलला की त्याला पूर्णत्वास नेण्याची आणि त्याला तडीस नेण्याची त्याची खासियत आहे.
अनेक आंदोलनकर्ते आपण पाहिले असतील एखादा महत्वाचा मुद्दा उचलतात.वातावरण तापवतात आणि शेवटी सांम ,दाम ,दंड ,भेदाने खचून जाऊन मुद्दा अर्धवट सोडून देतात.
ज्याने समाजसेवा करण्यासाठी स्थायी सरकारी नोकरीवर लाथ मारली,कुठलीही अपेक्षा न करता त्याने पक्षाचे काम केले.
पक्षफुटीनंतर न घाबरता सतत पक्षाची बाजू लावून धरली.अनेक आमिषे आली, धमक्या आल्या पण त्याला यांनी भीक घातली नाही.
जन्मदिन कसे साजरे करावेत या बाबत वेगळा पायंडा यांनी घालून दिला.प्रतेक जन्मदिनाला वेगवेगळे उपक्रम राबवले.कधी अनाथांचा नाथ झाला तर कधी वृद्धांचा वाली झाला.खऱ्या समाजसेवकांचा ज्याने सतत सत्कार करून ज्यांना ऊर्जा दिली,अनेकांना लिहिते केले.
विरोधकही ज्याच्याविषयी चांगलेच बोलतात. त्याच्या कार्याला गुपित मदतही करतात.
आपल्या मनमिळाऊ वागणुकीने आणि उदार पणामुळे ज्याने मोठा मित्रपरिवार जमा केला आहे.
ज्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे अनेक मित्र आज जवळ आहेत.खंत एक गोष्टीची वाटते ज्यांची सगळी कामे स्वतः शिरावर घेणारा एक चांगला मित्र,ज्याने मागच्या जन्मदिनाची संपूर्ण जबाबदारी खांद्यावर घेऊन पूर्णत्वास नेली होती तो कुमार(योगेश )पंजवानी आज हयात नाही,एक चांगला सहकारी सुखनंदन गवई हयात नाही.पण पत्रकार रामेश्वर गवई,राजू गायकवाड,किरण सोनवणे,मनोज कोरडे,सलीम मन्सूरी,यासारखे असंख्य करकर्ते त्यांच्या सोबत आहेत.तसेच अख्खी मसाप,कालिका कलामंडळ,अन्याय अत्याचार निर्मूलन समिती सोबत असल्यामुळे त्यांच्यांतील दबंगपणा कमी होत नाही, लेखणीची धार बोथट होत नाही,
ज्याच्या रोमारोमात प्रामाणीकपणा भरलेला आहे,निस्वार्थी बहू आयांमी व्यक्तिमत्व,स्पष्टवक्ता, निर्भीड पत्रकार,अफलातून चिकाटी,निष्ठावान, मित्र प्रेमी,कुटुंबवत्सल,सगळ्यांचा दादा.आज त्याचा जन्मदिन.
सत्ता संपत्ती असलेले अनेक पुत्र आपल्या वृद्ध आईवडिलांना वृद्धाश्रम दाखवतात.पण जो आजही या वयातही आईचा आदर करतो, आईचा ८७ वा वाढदिवस मोठ्या दिमाखाने साजरा करतो.
म्हणूनच अनेक मातांप्रमाणेच ती माता म्हणत असेल ‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तीही लोकी झेंडा.’
अशा गुंड पुत्रास म्हणजेच आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक,प्रोत्साहनकर्ते दिलीप मालवणकर साहेब यांना जन्मदिनाच्या khup शुभेच्छा
शांताराम ओंकार निकम
20 सप्टेंबर 2023