भिगवण पोलिसांची दमदार कामगिरी :शेतकरी वर्गाला दिलासा! कृषिपंप (मोटारी) व घरघुती साहित्य चोरणारी टोळी जेरबंद
(निलेश गायकवाड )
भिगवण – मदनवाडी वा परिसरातील , शेती कृषिपंपांना (मोटारी) लक्ष्य करून अनेक मोटारी व केबल चोरून नेत चोरट्यांनी उच्छाद मांडला असताना, भिगवण पोलिसांनी चौघांच्या टोळीला जेरबंद केले. त्यांच्याकडून चोरीच्या 19 इलेक्ट्रिक पाण्याच्या मोटारी, एक पाण्याचे इंजिन , तीन मोटरसायकली, एक फ्रिज, एक एलईडी टीव्ही, हरवलेले दहा मोबाईल असा एकूण आठ लाख 9 हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त केले. या टोळीकडून मोटार व चोरीचे बारा गुन्हे उघडकीस आल्याने मदनवाडी भागातील शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे.
पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांनी लावलेले कृषि पंप चोरीच्या घटनांत वाढ झाली होती. तालुक्याच्या भिगवण भागातील मदनवाडी तक्रारवाडी भादलवाडी कुंभारगाव डिकसळ पोंदवडी इतर भागातून अशा चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने व मोटारींअभावी पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकरी वर्ग हवालदील झाला होता.या पार्श्वभूमीवर अशा चोरीच्या घटनांची गांभीर्याने दखल घेण्याच्या सूचना जिल्हा पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांनी दिल्या होत्या. त्यानूसार पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी पथके तयार करून या मोटार चोरीवर व संशयित चोरांच्या हालचालीवर गेले काही दिवस बारीक लक्ष ठेवले.
पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम, पोलीस अमलदार विठ्ठल वारगड,सचिन पवार,महेश उगले, अंकुश माने, हसीन मुलानी , आप्पा भांडवलकर या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मदनवाडी येथील विश्वजीत उर्फ सुंदर तुकाराम ढवळे वय 23 वर्षे, रोहन उर्फ सखाराम डोंबाळे वय 21 वर्ष यांची टप्प्याटप्प्याने धरपकड केली. दरम्यान, पोलिस चौकशीत त्यांनी गु्न्ह्याची कबूली दिली. त्यांच्याकडून सुमारे दोन लाख 64 हजार रुपये किंमतीच्या 19 इलेट्रिक मोटारी, एक पाण्याचे इंजिण असे साहित्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक पवार यांनी दिली. या दोघांकडून 12 गुन्हे उघडकीस आले असून, त्यांच्याकडे अधिक तपास केला जात आहे.
टीव्ही,मोटरसायकल, फ्रिज चोरणारे दोन चोर संशयित रित्या पोलिसांच्या निदर्शनास आल्याने चौकशी दरम्यान त्यांच्याकडून उडवाउडुची उत्तरे मिळाल्याने 3 मोटरसायकल व वरील साहित्य असा एकूण दोन लाख पाच हजार रुपये किमतीचा हस्तगत करण्यात यामध्ये मदनवाडी येथील नितीन सखाराम हरिहर वय 33 वर्ष तसेच सलीम महेबुब शेख वय पंचवीस वर्ष यांच्याविरुद्ध भिगवण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील सखोल तपास चालू आहे.
पिकांना पाणी देण्यासाठी लावलेल्या कृषि पंपांचे संरक्षण करण्यासाठी परिसरातील शेतकरी बांधवांनी आपापसात गट तयार करावेत व रात्रीच्या वेळी आळीपाळीने गस्त घालावी. या गटांना ठराविक काळासाठी पोलिस मदतही दिली जाईल. इतर काही मोटार चोरांबाबत माहिती असल्यास ती पोलिसांना कळवावी. संबंधितांचे नाव गुप्त ठेवून मोटार चोरांवर जरब बसेल अशी कारवाई केली जाईल.- दिलीप पवार, पोलिस निरीक्षक, भिगवण पोलिस स्टेशन .