निवडणूक आयोगाचा अपेक्षित निक्काल !
अंधेर नगरी चौपट राजा !!
निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे का ? यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आजचा निक्काल आहे. निवडणूक आयोग हा सत्ताधारी केंद्र शासनाचा अंकित आहे,या समजास दुजोरा देणारा आजचा निकाल आहे.तो खळबळजनक असला तरी अनपेक्षित मुळीच नाही.
आज निवडणूक आयोगाने शिवसेना हे नांव व धनुष्यबाण हे चिन्ह बंडखोर गटास दिले. वास्तविक १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतिक्षा करून त्यांचा निर्णय राखून ठेवायला हवा होता,नव्हे तेच न्यायोचित ठरले असते. परंतू निवडणूक आयोगाने हे तारतम्य वा संयम पाळला नाही. इतकी घिसडघाई करण्याचा उद्देश हा मुळ शिवसेना व शिवसैनिकांचे खच्चिकरण करणे हाच असावा.ते खरे असेल तर मात्र ही बाब लोकशाही व संविधानासाठी घातक आहे.
केंद्र शासनाने इडी,आयटी, सीबीआय, या स्वायत्त संस्थांचा कसा गैरवापर केला आहे , या संस्थांनी सत्ताधारी पक्षाच्या विरोधकांना नामोहरण करण्यासाठी कसा केला आहे? हे गेल्या ८ महिन्यांपासून आपण अनुभवले आहे. आजवर भाजपाच्या एकाही लोकप्रतिनिधीवर या संस्थांनी कोणतीही कारवाई केली नाही,या उलट विरोधकांवर दबाव आणण्यासाठी या यंत्रणांचा वापर करून त्यांना आपल्याकडे वळवले आहे. एकनाथ शिंदे,प्रताप सरनाईक,
भावना गवळी, यशवंत जाधव व त्यांच्या पत्नी यामिनी जाधव या सारखे भाजपाचे चरणदास होताच त्यांच्यावरील कारवाईच्या फाईली बंद झाल्या. ही कसली आली लोकशाही व न्यायप्रिय शासन व्यवस्था ?
शिवसेना हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी ५६ वर्षांपुर्वी स्थापन केलेला पक्ष आहे. त्याची अधिकृत नोंदणी घटनेच्या आधारे निवडणूक आयोगाकडे झाली आहे.काही बंडखोर व आत्मकेंद्रित आमदार खासदार वैयक्तिक स्वार्थासाठी पक्षद्रोह करून बंडखोरी
करतात,म्हणून तो पक्ष त्यांचा
होऊ शकत नाही.पक्षांतर बंदी कायदा व घटनेच्या परिशिष़्ट १० नुसार ते अपात्र ठरतात ! हे निर्विवाद सत्य आहे.परंतू निवडणूक आयोगाने पक्षाचे शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह बंडखोरांना देऊन
लोकशाहीचा गळा घोटला आहे,
अशीच सर्व सामान्य जनतेची भावना झाली आहे.
रामाला वनवास भोगावा लागला,
रावणाचा क्षणिक विजयही झाला परंतू शेवटी रावणाची सोन्याची लंका जळून खाक झाली,रावणाचे दहन झाले, हे रामायणाने आपल्याला शिकवले आहे. हेच जीवनाचे सत्य आहे.*आज असत्य रावणाचा विजय झाला असला तरी तो विजयानंद जास्त काळ टिणार नाही,हे मात्र निश्चित आहे. या निर्णया विरोधात मुळ शिवसेना नक्कीच सर्वोच्च न्यायालयात दाद मागेल.*
*निवडणूक आयोग हे अंतिम नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अंतिम मानला जातो.त्यामुळे निष्ठावंतांनी हतबल होऊ नये. असत्याचा विजय हा क्षणिक असतो तर सत्याचा विजय हा अजरामर असतो.सर्वोच्च न्यायालयात सत्याचा विजय होऊन शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह पुन्हा उद्धव बाळासाहेबांच्या शिवसेनेस मिळेल,
याबद्धल माझ्या मनात कोणताही किंतू परंतू नाही.*
गम कि अंधेरी रातमें
दिलको यूं न बेकार कर
सुबह जरूर आयेगी
सुबह का इंतजार कर
हेच या प्रसंगी मी निष्ठावंतांना सांगू इच्छितो !
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
९८२२९०२४७०