छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल Instagramवर आक्षेपार्ह टिप्पणी; शिवप्रेमी संतापले, अमळनेर पोलीस ठाण्यात निवेदन
अमळनेर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram वर एका व्यक्तीने अत्यंत आक्षेपार्ह व अश्लील भाषेत टिप्पणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे शिवप्रेमी आणि शिवभक्तांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून, संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तसेच समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने अमळनेर पोलीस ठाण्यात प्रशासनाला निवेदन देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक किंवा आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर प्रसारित करून सामाजिक भावना दुखावणाऱ्यांवर प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे आराध्य दैवत नसून स्वराज्य, शौर्य आणि अस्मितेचे प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे महाराजांच्या सन्मानाशी कोणत्याही प्रकारची तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशारा संघटनांनी दिला. सोशल मीडियाचा गैरवापर करून महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर वेळीच कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भावना शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्याने माफी मागितली; पोलिसांच्या तत्परतेमुळे वातावरण निवळले