करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- डबल महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत मातीच्या लाल मातीत पैलवानांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत ६५ किलो वजन गटात पैलवान विक्रांत जाधव याने अटीतटीच्या लढतीत प्रथम क्रमांक पटकावत मानाची गदा, मानचिन्ह (मेडल) आणि रोख रक्कम जिंकली.
विक्रांत जाधव याने यापूर्वीही शालेय कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत विभागीय आणि राज्यस्तरीय पातळीवर सातत्याने क्रमांक पटकावले आहेत. अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातून संघर्ष करत त्यांनी मिळवलेले हे यश युवा मल्लांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्याच्या या उज्ज्वल यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत असून, तो कैकाडी समाजाचे नाव राज्य पातळीवर उंचावत असल्याने समाजाच्या वतीने त्याचे विशेष अभिनंदन व सत्कार करण्यात येत आहे.
तसेच याच स्पर्धेत ८० किलो वजन गटात जिंती येथील रोहित दंगले यानेही चमकदार कामगिरी करत राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून मानाची गदा, मेडल आणि रोख रकमेचे पारितोषिक आपल्या नावावर केले.
या भव्य पारितोषिक वितरण सोहळ्याला क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते. यामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे, टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी जाधव, महाराष्ट्र चॅम्पियन अनिल जाधव, प्रताप जगताप, संतोषभाऊ जाधव, दत्ता वस्ताद गायकवाड, नगरसेवक रवी जाधव, मारुती आबा जाधव, अजय जाधव, बिल्डर विशाल जाधव, सनी जाधव, प्रेम जाधव, अनिकेत जाधव, मिटू जाधव, सुरेश नाना शिंदे अण्णा वस्ताद नायकोडे आणि देवा जाधव आदी प्रमुख उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजयी मल्लांना गौरविण्यात आले.