निंबोडीच्या उपसरपंचपदी पुनम सोनवणे यांची बिनविरोध निवड; 1958 नंतर पहिल्यांदाच एकाच घरात सरपंच-उपसरपंच
प्रतिनिधी(निलेश गायकवाड)
बारामती : वृत्तसेवा – निंबोडी (ता. बारामती) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. पुनम सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सरपंच संतोष सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून ग्राम विस्तार अधिकारी अनिल जगताप यांनी कामकाज पाहिले. निवडीनंतर उपस्थित ग्रामस्थांनी नवनिर्वाचित उपसरपंच पुनम सोनवणे यांचे अभिनंदन केले.
निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित उपसरपंच पुनम सोनवणे म्हणाल्या, गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकासकामांना गती देण्यासोबतच नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार आहे. विशेषतः महिलांसाठी विशेष काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महिला आरोग्य शिबिर, महिला सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांचे हिमोग्लोबिन, बीपी, शुगर तपासणी तसेच बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी नवीन रोजगार उपलब्ध करून देण्यावर आपला भर राहील, असे त्यांनी यावेळी सांगितले.
विशेष बाब म्हणजे, 1958 साली ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच एकाच घरातील सासरा आणि सून सरपंच व उपसरपंच झाल्याची घटना निंबोडी ग्रामपंचायतीत घडली आहे. त्यामुळे गावात याची चर्चा रंगली आहे.