करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):- भारतीय संस्कृतीत बळीराजाचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि शेतीचा मुख्य आधार असलेल्या लाडक्या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करमाळा शहरात ‘बैलपोळा मिरवणूक सोहळा २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. विठ्ठल आप्पा सावंत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या मिरवणुकीचे आयोजन केले आहे. करमाळा शहरात आकर्षक बैलपोळ्याची मिरवणूक सावंत परिवाराकडून दरवर्षी मोठ्या उत्साहात व आनंदात काढली जाते. यावेळी संपूर्ण सावंत परिवार व सावंत गटावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी होतात. सावंत व्यापारी, करमाळा यांच्या प्रमुख व विशेष नियोजनाखाली हा सोहळा संपन्न होत आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी आहे की, उद्या गुरुवार दिनांक १० सप्टेंबर २०२६ दुपारी ३:०० वाजता सावंत गल्लीपासून भव्य मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध उस्मान शहा ब्रास बँड, शंकरपूर (जि. छत्रपती संभाजीनगर) हे असणार असून, त्यांच्या तालावर निघणारी ही मिरवणूक शहरवासीयांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. परंपरेचा गोडवा जपत आयोजित केलेल्या या आनंदोत्सवात आणि भव्य मिरवणूक सोहळ्यात परिसरातील जास्तीत जास्त शेतकरी बांधव, नागरिक व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बैलपोळा सण उत्साहात जावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.