बनावट लिंक व APK पासून सावध राहा; परिवहन विभागाचे आवाहन
पुणे, प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलान आदी परिवहन विभागाच्या सेवांच्या नावाखाली बनावट संकेतस्थळे, अनधिकृत APK अॅप्स तसेच SMS व WhatsApp द्वारे पाठविल्या जाणाऱ्या खोट्या लिंकच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक फसवणूक आणि वैयक्तिक माहितीची चोरी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वाहन चालक व वाहन मालकांनी अशा बनावट लिंकपासून सावध राहून केवळ परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करावा, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.
वाहन नोंदणीसाठी VAHAN (https://vahan.parivahan.gov.in, ड्रायव्हिंग लायसन्ससाठी SARATHI (https://sarathi.parivahan.gov.in, परिवहन सेवांसाठी Parivahan (https://www.parivahan.gov.inआणि ई-चलानसाठी NextGen eChallan (https://echallan.parivahan.nic.in/challan या अधिकृत संकेतस्थळांचा वापर करावा. अनोळखी किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करून वैयक्तिक, बँकिंग अथवा ओटीपीशी संबंधित माहिती देऊ नये.
RTO कार्यालय किंवा परिवहन विभागाकडून WhatsApp द्वारे पेमेंट लिंक पाठविली जात नाही. त्यामुळे “दंड त्वरित भरा”, “तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स सस्पेंड होणार आहे” अशा धमकीवजा संदेशांवर विश्वास ठेवू नये. अशा संदेशांमधील लिंकवर क्लिक करू नये.
तसेच RTO Services.apk, Parivahan_Update.apk, eChalan Pay.apk यांसारखे अनधिकृत APK अॅप्स मोबाईलमध्ये डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू नयेत. अशा अॅप्समुळे मोबाईलमधील संवेदनशील माहिती चोरीला जाण्याची तसेच आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे.
संशयास्पद संदेश किंवा लिंक प्राप्त झाल्यास नागरिकांनी राष्ट्रीय सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार करावी किंवा सायबर फसवणूक हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधावा. तसेच जवळच्या जिल्हा सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.
अधिकृत संकेतस्थळांवरूनच परिवहन सेवांचा लाभ घ्या आणि बनावट लिंक व APK पासून सावध राहा, असे आवाहन विभागाने केले आहे.