करमाळा पोलिसांची दमदार कामगिरी! CEIR पोर्टलच्या मदतीने ६ लाख ३० हजारांचे २८ गहाळ मोबाईल शोधून तक्रारदारांना परत
करमाळा | प्रतिनिधी :
गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेऊन तो पुन्हा मिळणे ही नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बाब असते. करमाळा पोलिसांनी तांत्रिक तपास आणि CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलचा प्रभावी वापर करत तब्बल २८ गहाळ मोबाईल फोन शोधून काढत ते संबंधित तक्रारदारांना परत केले आहेत. या मोबाईलची अंदाजे किंमत ६ लाख ३० हजार रुपये आहे.
करमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सन २०२४, २०२५ आणि २०२६ या कालावधीत गहाळ झालेल्या मोबाईल फोनबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी सायबर तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाईलचा शोध सुरू केला. सायबर पोलीस ठाणे तसेच CEIR पोर्टलच्या माध्यमातून करण्यात आलेल्या तांत्रिक तपासातून २८ मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
या मोबाईलची एकूण अंदाजे किंमत रु. ६,३०,०००/- असून, ते संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आले. त्यामुळे मोबाईल हरवल्याने चिंतेत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा, व्ही एस मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
CEIR पोर्टलचे कामकाज पाहणारे पोलीस कर्मचारी स्वप्नील शेखाने, पोलीस कर्मचारी प्रकाश जगदाळे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सोनवणे यांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल मोबाईल परत मिळालेल्या तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले आहे.
याबाबत नागरिकांनी मोबाईल वापरताना कोणती सावधगिरी बाळगावी याबाबत ही पोलीस अधिकारी यांनी माहिती देताना सांगितले की, मोबाईलमध्ये वैयक्तिक माहिती, फोटो, बँकिंग आणि महत्त्वाची कागदपत्रे असतात. त्यामुळे नागरिकांनी मोबाईलच्या सुरक्षेबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच अनोळखी व्यक्तीला OTP, PIN, पासवर्ड किंवा UPI PIN सांगू नका. मोबाईलला Screen Lock/Password अवश्य ठेवा. त्याचप्रमाणे अनोळखी लिंक, APK किंवा संशयास्पद ॲप डाउनलोड करू नका. बँकिंगची माहिती कोणालाही फोनवरून देऊ नका. सार्वजनिक Wi-Fi वापरताना संवेदनशील व्यवहार टाळा. मोबाईल हरवल्यास तात्काळ SIM व बँकिंग सेवा सुरक्षित करा आणि पोलिसांकडे तक्रार नोंदवा असे आवाहन करमाळा पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.