बारामतीत गणेशोत्सवासाठी प्रशासन सज्ज; DJ आणि ध्वनीप्रदूषणावर पोलिसांची करडी नजर

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-09-01 at 9.24.28 AM

बारामतीत गणेशोत्सवासाठी प्रशासन सज्ज; DJ आणि ध्वनीप्रदूषणावर पोलिसांची करडी नजर
पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांची गणेशोत्सव मंडळांना स्पष्ट सूचना; “कायदा पाळणाऱ्यांना पूर्ण सहकार्य, ध्वनीप्रदूषणाबाबत मात्र कोणतीही तडजोड नाही”

बारामती, प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

आगामी दहीहंडी व गणेशोत्सव शांततामय, सुरक्षित, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, तसेच गणेशोत्सव मंडळांच्या अडचणी उत्सवापूर्वीच सोडविण्यासाठी प्रशासन आणि मंडळांमध्ये प्रभावी समन्वय निर्माण व्हावा, या उद्देशाने बारामती येथे सोमवारी (दि. 31 ऑगस्ट) भव्य समन्वय व मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी “गणेशोत्सवाचा आनंद मनमुराद घ्या; मात्र कर्णकर्कश DJ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नका,” असा स्पष्ट इशारा पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी गणेशोत्सव मंडळांना दिला.

कविवर्य मोरोपंत हॉल, बारामती येथे झालेल्या या बैठकीला बारामती शहर, बारामती तालुका, वडगाव निंबाळकर, सुपा आणि माळेगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील दहीहंडी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे सुमारे 300 ते 400 अध्यक्ष, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीस पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी दिघे, तहसीलदार रावडे, माळेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, सुपा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते, बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपरिषद व इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

🟢मंडळांच्या समस्या थेट प्रशासनासमोर

गणेशोत्सव मंडळांच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना बैठकीत आपल्या समस्या, अडचणी आणि सूचना थेट प्रशासनासमोर मांडण्याची संधी देण्यात आली. गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील झाडांच्या वाढलेल्या फांद्या, रस्त्यावरील स्पीड ब्रेकर व उंचवटे, विद्युत तारा, रस्त्यातील इतर अडथळे, वाहतूक नियोजन, मंडप उभारणी तसेच DJ आणि ध्वनीव्यवस्थेबाबतच्या विविध समस्या यावेळी मांडण्यात आल्या.

गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर अडचणी निर्माण होण्याऐवजी उत्सवापूर्वीच त्यांचे निराकरण करण्यात यावे, अशी अपेक्षा मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

यावर संबंधित शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी मंडळांच्या समस्या गांभीर्याने घेत त्यांच्या अखत्यारितील अडचणी प्राधान्याने सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव यांनीही गणेशोत्सव मंडळांना नगरपरिषदेच्या वतीने आवश्यक ते प्रशासकीय सहकार्य करण्यात येईल, तसेच नगरपरिषदेशी संबंधित समस्या निदर्शनास आणून दिल्यास त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यासाठी कार्यवाही केली जाईल, असे स्पष्ट केले.

🟣DJ बाबत पोलीस अधीक्षकांची कठोर भूमिका

बैठकीतील सर्वाधिक चर्चेचा आणि महत्त्वाचा मुद्दा ठरला तो DJ, मोठ्या क्षमतेच्या साऊंड सिस्टीम आणि ध्वनीप्रदूषणाचा.

पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. गणेशोत्सव हा भक्ती, आनंद आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. कायद्याच्या चौकटीत उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना पोलीस प्रशासनाचे पूर्ण सहकार्य राहील; मात्र उत्सवाच्या नावाखाली कर्णकर्कश आवाज करून महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

“नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. ध्वनीप्रदूषणाच्या नियमांच्या अंमलबजावणीत कोणताही कॉम्प्रमाईज केला जाणार नाही,” असा ठाम संदेश त्यांनी गणेशोत्सव मंडळे, DJ चालक आणि मालकांना दिला.

🔸“आवाज किती आहे हे अंदाजाने नाही, यंत्राने ठरणार”

गणेशोत्सवाच्या काळात ध्वनीमर्यादांचे उल्लंघन होत असल्याचे आढळल्यास संबंधित ठिकाणी ध्वनीमापक यंत्राद्वारे प्रत्यक्ष आवाजाची मोजणी केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.

केवळ एखाद्या व्यक्तीच्या तक्रारीवर किंवा अंदाजावर कारवाई न करता तांत्रिक साधनांच्या माध्यमातून ध्वनीपातळीची नोंद केली जाईल. संबंधित क्षेत्रासाठी कायद्याने निश्चित केलेल्या अनुज्ञेय ध्वनीमर्यादेपेक्षा आवाज अधिक असल्याचे आढळल्यास उपलब्ध पुराव्यांच्या आधारे कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

आवश्यकतेनुसार एकापेक्षा अधिक ध्वनीमापक यंत्रांचा वापर करून नोंदी घेण्यात येणार आहेत. न्यायालयीन निर्देश, Noise Pollution (Regulation and Control) Rules तसेच सक्षम प्राधिकरणाने घालून दिलेल्या अटींचे काटेकोर पालन केले जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

🔷“मोठा DJ म्हणजे मोठा उत्सव नव्हे”

अतितीव्र आवाजामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबतही पोलीस अधीक्षकांनी गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

विशेषतः महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना कर्णकर्कश आवाजाचा मोठा त्रास होऊ शकतो. अतितीव्र आवाजामुळे श्रवणशक्तीवर परिणाम, डोकेदुखी, चिडचिड आणि मानसिक ताण वाढण्याची शक्यता असते. रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांना याचा अधिक त्रास होऊ शकतो.

तसेच मिरवणुकीदरम्यान प्रचंड आवाजामुळे पोलीस किंवा स्वयंसेवकांकडून दिल्या जाणाऱ्या आपत्कालीन सूचना ऐकू न आल्यास गर्दी नियंत्रण आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात.

DJ च्या आवाजाची मंडळा-मंडळांमध्ये स्पर्धा होणे, मोठ्या DJ वाहनांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होणे तसेच गर्दीत धक्काबुक्की किंवा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेऊन मंडळांनी स्वतःहून जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन करण्यात आले.

🔴परवानगी घेतली म्हणजे अमर्याद आवाजाची मुभा नाही

DJ आणि ध्वनिक्षेपकाच्या परवानगीबाबत असलेला गैरसमजही पोलीस अधीक्षकांनी दूर केला.

“परवानगी घेतली म्हणजे अमर्याद आवाज करण्याची परवानगी मिळाली, असा गैरसमज कोणीही करून घेऊ नये,” असे त्यांनी स्पष्ट केले.

ध्वनिक्षेपकाची परवानगी, त्यातील अटी, वेळेची मर्यादा, परिसराच्या वर्गवारीनुसार लागू असलेल्या ध्वनीमर्यादा आणि न्यायालयीन आदेशांचे पालन करणे आयोजक, DJ मालक आणि चालक यांच्यावर बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले.

नियमांचे उल्लंघन झाल्यास मंडळाचा आकार, संबंधित व्यक्तीचा प्रभाव किंवा कोणताही अन्य दबाव विचारात न घेता कायद्यानुसार समान आणि निष्पक्ष कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला.

🟤“गणरायाच्या भक्तीचा आवाज असावा, नागरिकांच्या त्रासाचा नाही”

गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा आणि सकारात्मक संदेश देण्यावरही पोलीस प्रशासनाने भर दिला.

आरती, भजन, अभंग, ढोल-ताशा, लेझीम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक प्रबोधनाच्या उपक्रमांना प्राधान्य देऊन पारंपरिक उत्सवाची ओळख जपावी. केवळ मोठ्या आवाजालाच प्रतिष्ठा किंवा मंडळाच्या मोठेपणाचे प्रतीक समजू नये, असे आवाहन करण्यात आले.

गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव, महिला सुरक्षा, सायबर जनजागृती, व्यसनमुक्ती, वाहतूक शिस्त, रक्तदान, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक प्रबोधन यांसारखे उपक्रम राबवून समाजासमोर आदर्श निर्माण करावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

🟡स्थापनेपासून विसर्जनापर्यंत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

बैठकीत गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणी, विद्युत सुरक्षा, अग्निशमन व्यवस्था, CCTV, स्वयंसेवक नियुक्ती, महिला व बालकांची सुरक्षा, गर्दी व्यवस्थापन, पार्किंग, वाहतूक व्यवस्था, महाप्रसाद व अन्नसुरक्षा, आपत्कालीन संपर्क व्यवस्था, गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जन मिरवणुकीबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.

मंडपामुळे रुग्णवाहिका, अग्निशमन दल अथवा इतर आपत्कालीन वाहनांचा मार्ग अडविला जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले. विद्युत जोडणी अधिकृत इलेक्ट्रिशियनकडूनच करून घेणे, अग्निशामक यंत्रणा उपलब्ध ठेवणे आणि संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती देणे, अशा सूचना देण्यात आल्या.

मिरवणुकीदरम्यान मद्यपान, मादक पदार्थांचे सेवन, धोकादायक शस्त्रांचे प्रदर्शन तसेच सामाजिक किंवा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घोषणा यांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.

विसर्जन मिरवणुकीसाठी प्रशासनाने निश्चित केलेला मार्ग व वेळ पाळणे, विनापरवानगी मार्ग न बदलणे, विद्युत तारा व झाडांच्या फांद्यांची पूर्वतपासणी करणे तसेच विसर्जन स्थळी पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.

🔵“उत्सव तुमचा; सुरक्षा आपली सर्वांची”

या बैठकीत पोलीस प्रशासनाने गणेशोत्सव मंडळांशी संघर्षाची नव्हे तर समन्वय, सहकार्य आणि जबाबदारीची भूमिका स्पष्ट केली. मंडळांच्या रास्त अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन तत्पर राहील; मात्र नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित नियमांकडे दुर्लक्ष केले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश देण्यात आला.

पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी मंडळांना आवाहन करताना सांगितले की, गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करा; परंपरा, भक्ती आणि सामाजिक एकोपा जपा. मात्र कर्णकर्कश आवाज करून दुसऱ्याच्या आरोग्यावर आणि शांततेवर अतिक्रमण करू नका.

कायदा पाळणाऱ्या प्रत्येक गणेशोत्सव मंडळाला पोलीस प्रशासनाचे पूर्ण सहकार्य राहील; मात्र जाणूनबुजून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या बैठकीतून देण्यात आला.

💥बारामती पोलिसांचे आवाहन

“सुरक्षित गणेशोत्सव – शांततामय गणेशोत्सव – शिस्तबद्ध गणेशोत्सव – पर्यावरणपूरक गणेशोत्सव” साजरा करण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळे, DJ चालक-मालक, कार्यकर्ते आणि नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन बारामती शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!