अमळनेर–गलवाडे रस्त्यावर भीषण अपघात; उभ्या डंपरला स्कुटीची धडक, दोघांचा जागीच मृत्यू
अमळनेर : विक्की जाधव.
गलवाडे येथील भंडारा प्रसादाच्या कार्यक्रमाहून स्कुटीवरून परतणाऱ्या दोन जणांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ३० ऑगस्ट रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास अमळनेर–गलवाडे रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ घडली. रंजाणे येथील पंडित धाकू भिल (वय ५०) आणि नागो अमृत सपकाळे (वय ४५) अशी मृतांची नावे आहेत.
दोघेही स्कुटी क्रमांक MH 54 E 764 वरून गलवाडे येथे कार्यक्रमासाठी गेले होते. पंडित भिल हे स्कुटी चालवत होते, तर नागो सपकाळे मागे बसले होते. कार्यक्रम आटोपून परतत असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने स्कुटी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपर क्रमांक MH 18 M 7857 वर जोरदार आदळली. धडक इतकी भीषण होती की दोघांनाही गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, उपनिरीक्षक समाधान गायकवाड, नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, वाहतूक पोलीस संजय बोरसे, विनय पाटील, मयुर पाटील, गणेश पाटील व अविनाश भदाणे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या घटनेने रंजाणे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.