बारामती तालुका पोलिसांची मोठी कामगिरी; दरोड्यातील ४.५ लाखांचा मुद्देमाल फिर्यादीस परत
(निलेश गायकवाड)
बारामती (प्रतिनिधी) – बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील जप्त केलेला सोन्या-चांदीचा ऐवज आणि रोख रक्कम आज दिनांक २८/०८/२०२६ रोजी फिर्यादीस परत करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
काय आहे घटना?
दि. ०४/०५/२०२६ रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी बारामती येथे पॅजो कंपनीच्या पाठीमागील रोडवर फिर्यादी श्री. सुरज सर्जेराव गावडे (वय २७, रा. धनगरवाडा, ता. तासगाव, जि. सांगली) यांना पाच अनोळखी इसमांनी गहू देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. त्यानंतर रिक्षा चालक फिर्यादी व त्यांच्या ड्रायव्हरच्या कपाळाला धाक दाखवून मारहाण करत –
१) २,०००/- रु. चे सिल्व्हर रंगाचे मार्शल कंपनीचे घड्याळ
२) १,०००/- रु. च्या चांदीच्या दोन अंगठ्या
३) १५,०००/- रु. ची एक ग्रॅम वजनाची सोन्याची बाळी
४) २५,५००/- रु. रोख रक्कम (५०० रुपयांच्या ५१ नोटा)
असा एकूण ५१,५०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेऊन आरोपी पळून गेले होते.
याप्रकरणी बारामती तालुका पोलीस स्टेशनला दि. ०५/०५/२०२६ रोजी गु.र.जि. नंबर २०८/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३१०(२), आर्म ऍक्ट ३, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी –
१) रवी संजय माने (२५, रा. कुंभारक वस्ती, वंजारवाडी )
२) श्रीकांत अर्जुन धुले (२६, रा. खताळपट्टा)
३) अभिषेक भाऊसो ढोबरे (२७, रा. खताळपट्टा)
४) अतुल मोहन मोलनकर (२९, रा. कुंभारक वस्ती)
या चौघांना अटक करून त्यांच्याकडून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
आज रोजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १०६(३) प्रमाणे सदरचा मुद्देमाल फिर्यादीस परत देण्यात आला.
ही यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार सपोनि विक्रम पवार आणि मुद्देमाल कारकून म.पो.हवा. १२०० भारती खंडागळे यांनी पार पाडली आहे.