अमळनेरकरांचा अंत बघू नका; पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चाचा इशारा

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260820-WA1254

अमळनेरकरांचा अंत बघू नका; पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चाचा इशारा

 

अमळनेर : विक्की जाधव.

शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावरून सामाजिक कार्यकर्ते तथा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, जितेंद्र (जितू) ठाकूर यांनी पालिका प्रशासनावर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. ३१ जुलैच्या पुरात केवळ दोन-तीन पाईप वाहून गेले असताना त्यांची तात्पुरती जोडणी करून नागरिकांना दिलासा देणे शक्य होते; मात्र दुरुस्तीचे काम लांबविल्याने आज अमळनेरकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. येत्या दोन ते चार दिवसांत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास नागरिकांना सोबत घेऊन पालिकेवर जनमोर्चा काढण्याचा इशारा ठाकूर यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे.

शहरातील अनेक भागांत गेल्या १५ ते २० दिवसांपासून पाण्याचा थेंबही मिळत नसताना काही भागांत बायपास लाईनवरून नियमित पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप करत त्यांनी पाणीवाटपातील कथित भेदभावावरही सवाल उपस्थित केला. पालिका प्रशासनाकडून सोशल मीडियावर काम सुरू असल्याचे फोटो, व्हिडिओ आणि रील्स प्रसिद्ध केले जात असले, तरी प्रत्यक्षात नागरिकांची तहान भागविण्यासाठी कामाचा वेग पुरेसा नसल्याचे ठाकूर यांनी म्हटले आहे. पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत टँकरद्वारे मोफत पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी करत, नागरिकांकडून पाणीपट्टी वसूल करण्यापूर्वी त्यांना पुरेसे आणि नियमित पाणी देण्याचा जाब पालिकेने द्यावा, असेही त्यांनी सुनावले.

दरम्यान, पाईपलाईन दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर श्रेयासाठी फोटोसेशन आणि सोशल मीडिया पोस्टचा धडाका सुरू होण्याची शक्यता व्यक्त करत ठाकूर यांनी पालिका पदाधिकाऱ्यांवर टीका केली. “जनतेला पाणी हवे आहे, उद्घाटनाचा सोहळा नाही,” असा टोला लगावत नागरिकांच्या तहानेपेक्षा श्रेयाचे राजकारण महत्त्वाचे ठरू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. अमळनेरची जनता संयमी आहे; मात्र तिच्या संयमाचा अंत पाहू नये. दोन ते चार दिवसांत पाणीप्रश्न मार्गी न लागल्यास सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन पालिकेवर थेट मोर्चा धडकवू, असा इशारा ठाकूर यांनी दिला आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!