सोनम वांगचूक यांना आंदोलनस्थळावरून जबरदस्ती हटवल्याचा आरोप; लाठीच्या जोरावर सरकार आंदोलन दडपणार?
विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी देशभरातून दिल्लीकडे कूच;
मार्मिक न्यूज नेटवर्क :
सर्वसामान्य विद्यार्थी आणि गरीब कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी अन्न-पाण्याचा त्याग करून सुरू केलेल्या उपोषणाला १९ दिवस पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, १८ जुलै रोजी दिल्ली पोलिसांनी आंदोलनस्थळी जाऊन दबावतंत्राचा वापर करत वांगचूक यांना जबरदस्तीने उपोषणस्थळावरून हटवल्याचा तसेच आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला आहे. या घटनेनंतर विद्यार्थी, पालक आणि विविध सामाजिक संघटनांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर कोक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी देशभरातील विद्यार्थी, पालक आणि जनतेला २० जुलै रोजी दिल्लीत होणाऱ्या भव्य मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. शिक्षणाच्या हक्कासाठी उभारल्या जाणाऱ्या या लढ्यात प्रत्येक जागरूक नागरिकाने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. आयोजकांच्या म्हणण्यानुसार, देशभरातून विविध सामाजिक संघटना, विविध पक्षांचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर्स, विद्यार्थी, पालक आणि सामान्य नागरिक दिल्लीकडे रवाना होत आहेत. या मोर्चामध्ये संबंधित घटनेची जबाबदारी शासनाने स्वीकारावी, दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशा प्रमुख मागण्या मांडल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या मोर्च्याचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा नेत्याचा झेंडा अथवा फोटो वापरला जाणार नसल्याचा आयोजकांचा दावा आहे. त्याऐवजी देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांचे फोटो आणि राष्ट्रहिताचा संदेश घेऊन हा मोर्चा काढला जाणार असल्याचे सांगण्यात आले. २० जुलै रोजी दिल्लीत होणाऱ्या या मोर्चाकडे देशभरातील विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.