बारामती रेल्वे स्थानकाचा कायापालट;अत्याधुनिक रेल्वे स्थानक राष्ट्राला समर्पित!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण.
बारामती, प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशभरातील ७५ अत्याधुनिक रेल्वे स्थानकांचे तसेच महाराष्ट्रातील बारामती आणि नांदुरा या दोन पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. बारामती रेल्वे स्थानक येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित करत बारामती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास हा केवळ एका स्थानकाचा कायापालट नसून बारामतीसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी विकासाला नवी गती देणारा महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले.
यावेळी पुणे रेल्वे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा, बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, रेल्वे विभागाचे अधिकारी-कर्मचारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वे आधुनिकतेच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करत आहे. जागतिक दर्जाच्या सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षित आणि प्रवासीस्नेही सेवा यांमुळे भारतीय रेल्वे नव्या भारताच्या विकासाचे प्रतीक बनली आहे. अमृत भारत स्टेशन योजना, वंदे भारतसारख्या आधुनिक रेल्वे सेवा आणि विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे देशातील रेल्वे व्यवस्थेचे स्वरूप वेगाने बदलत असल्याचे त्यांनी नमूद केले.
त्यांनी सांगितले की, बारामती रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी सुमारे साडे २६ कोटी रुपये खर्च करण्यात आला असून राज्य शासन आणि रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा करून हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात आला आहे. नव्याने विकसित करण्यात आलेल्या स्थानकात आधुनिक प्रतीक्षागृह, स्वच्छ प्रसाधनगृहे, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी सुलभ सुविधा, अत्याधुनिक सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्था, पर्यावरणपूरक सौरऊर्जा प्रणाली, आकर्षक वास्तुरचना तसेच स्थानिक हस्तकला व उत्पादनांच्या विक्रीसाठी विशेष दालनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेलाही चालना मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बारामती हे उद्योग, शिक्षण, कृषी आणि सहकार क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र असून आधुनिक रेल्वे स्थानकामुळे या सर्व क्षेत्रांना मोठा लाभ होणार आहे. औद्योगिक क्षेत्राला अधिक सक्षम वाहतूक व्यवस्था, शेतकऱ्यांना कृषी उत्पादनांसाठी विस्तृत बाजारपेठ, तसेच शिक्षणासाठी येणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि दर्जेदार प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी देशातील आतापर्यंत २६१ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास पूर्ण झाला असून आज आणखी ७५ स्थानके राष्ट्राला समर्पित होत असल्याचे सांगत ही देशासाठी अभिमानाची बाब असल्याचे नमूद केले. या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे त्यांनी आभार मानले.

बारामती रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, विकासाची जाणीव आणि सर्जनशीलता वाढावी या उद्देशाने निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. “विकसित रेल्वे स्थानकाचा भारत” आणि “विकसित भारत घडवण्यासाठी मी काय करेन” या विषयांवर झालेल्या स्पर्धांमध्ये एम.ई.एस. गजाननराव भीमराव देशपांडे विद्यालय, निर्मला हरिभाऊ प्राथमिक शाळेसह विविध शाळांतील एकूण २ हजार ८५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी स्वच्छ, सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि सर्वसमावेशक रेल्वे स्थानकाची संकल्पना मांडत विकसित भारतासाठी स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, शिस्त, शिक्षण, तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि सामाजिक जबाबदारी या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे तसेच विजेत्यांचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते पुनर्विकसित बारामती रेल्वे स्थानकाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण स्थानकाची पाहणी करून विविध आधुनिक सुविधांची माहिती घेतली. तसेच स्थानकावर थांबलेल्या रेल्वेमध्ये जाऊन प्रवासी व विक्रेत्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, सूचना आणि अनुभव जाणून घेतले.
प्रास्ताविकात विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांनी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुणे विभागातील रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा आढावा घेत बारामती रेल्वे स्थानकाचा ऐतिहासिक प्रवास उलगडला. पुनर्विकसित स्थानकामुळे प्रवाशांना अधिक दर्जेदार आणि सुरक्षित सेवा उपलब्ध होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
समारोपात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी रेल्वे मंत्रालय, रेल्वे विकास निगम लिमिटेड, रेल्वे प्रशासन तसेच या प्रकल्पात योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. नव्याने उभारण्यात आलेल्या आधुनिक रेल्वे स्थानकाची स्वच्छता, सौंदर्य आणि शिस्त जपण्याचे आवाहन त्यांनी बारामतीकरांना केले. या पुनर्विकासामुळे बारामतीच्या प्रगतीला नवी दिशा मिळून पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला अधिक वेग मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.