विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सावनेर–केळवद मार्गावर सायंकाळची ५ वाजताची बस सेवा सुरू करण्याची मागणी

सावनेर, प्रतिनिधी : सावनेर–केळवद मार्गावरील जटामखोरा, सावळी (मो.), बिडगाव, रायबासा आदी गावांतील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सायंकाळी ५ वाजताची बस सेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सावनेर आगार प्रमुखांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
संध्याकाळची ५ वाजताची बस सेवा बंद असल्यामुळे सावनेर – केळवद या मार्गावरील विद्यार्थी सावनेर येथे शिक्षणासाठी येतात नंतर विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी मोठा अडचणींचा सामना करत आहेत. सायंकाळच्या ५ वाजताची बस सेवा बंद झाल्याने विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी सायंकाळच्या ७ वाजताच्या बसची प्रतीक्षा करावी लागत असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे सायंकाळी घरी वेळेत पोहोचणे कठीण होत आहे. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी ही बस सेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी भाजपा युवा मोर्चा नागपूर (काटोल) ग्रामीणचे उपाध्यक्ष हरिष मोहतकर यांच्यासह निखिल पोटभरे, पिंटू सातपुते, आशिष गजभिये, कुणाल सातपुते आणि नितेश पाचपुते उपस्थित होते. संबंधित मागणीचा सकारात्मक विचार करून विद्यार्थ्यांच्या हितासाठी बस सेवा लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.