“वारंवार भेट नाकारली, अखेर खुर्चीच झाली निवेदनाची साक्षीदार!” अमळनेरात चालंयतरी काय..
अमळनेर : विक्की जाधव.
“नगराध्यक्ष भेटत नाहीत, मग नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा?” असा संतप्त प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने नगरपरिषद कार्यालयात अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. वारंवार वेळ मागूनही नगराध्यक्षांची भेट होत नसल्याने कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयातील रिकाम्या खुर्चीवरच निवेदन चिटकवून प्रशासनाविरोधात तीव्र निषेध नोंदविला. या अनोख्या आंदोलनाने नगरपरिषद कार्यालयात काही काळ चांगलीच खळबळ उडाली.
शहराध्यक्ष दत्तेश (डी.बी.) पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात अमरधामचे आधुनिकीकरण, प्रभाग क्रमांक ३ मधील आकार्यक्षम नगरसेवक नागरिकांच्या मूलभूत समस्याकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. यासंदर्भात परिसरातील गटारींची तातडीची कामे, नागरिकांच्या मूलभूत सुविधा, पावसाच्या पाण्याचा निचरा, सीसीटीव्ही, पाणीपुरवठा, स्वच्छता, पार्किंग, शोकसभागृह आदी अनेक मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. “लोकप्रतिनिधी नागरिकांसाठी असतो; नागरिकांनीच त्याला भेटण्यासाठी हेलपाटे मारावेत, ही लोकशाहीची शोकांतिका आहे,” अशी टीका करत प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा यापेक्षाही तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिला.