R अल्पवयीन मुलगी गरोदर; प्रसूतीनंतर प्रकरण उघड, बोदर्डेच्या तरुणावर पोक्सोसह गुन्हा
अमळनेर : विक्की जाधव.
तालुक्यातील बोदर्डे येथील एका तरुणाविरुद्ध अल्पवयीन मुलीशी लैंगिक संबंध ठेवल्याच्या आरोपावरून पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर आणि प्रसूती झाल्यानंतर हे प्रकरण समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोदर्डे येथील विनोद बाळू भिल याच्यावर अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. ८ मार्च रोजी संबंधित मुलगी सहा महिन्यांची गरोदर असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर २१ जून रोजी धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात तिची प्रसूती होऊन तिने एका मुलाला जन्म दिला. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुलीच्या वडिलांनी मारवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६४(२)(एम) तसेच पोक्सो कायदा, २०१२ अंतर्गत कलम ४, ८ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार करीत आहेत. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.