करमाळ्यात पावसाळ्यापूर्वीची खबरदारी; धोकादायक झाडांच्या फांद्या छाटणी मोहिमेमुळे अनर्थ टळला
करमाळा:
पावसाळ्यात होणाऱ्या वादळी वाऱ्यांमुळे व पडणाऱ्या पावसामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी करमाळा नगरपरिषद आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) यांनी पुढाकार घेत शहरात संयुक्त ‘धोकादायक झाड फांद्या छाटणी’ मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेमुळे शहरातील अनेक भागांत संभाव्य धोका टळला असून, नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
शहरातील अनेक ठिकाणी विजेच्या उच्च दाबाच्या (High Tension) तारांमधून अखंडित वीज प्रवाह सुरू असतो. मात्र, पावसाळ्यातील वादळी वाऱ्यांमुळे या तारांजवळ असलेल्या झाडांच्या फांद्या घर्षणाने तुटून पडण्याची किंवा शॉर्ट सर्किट होण्याची भीती निर्माण झाली होती. किल्ला परिसरातील जोगळेकर यांच्या घरासमोरील झाड आणि वेशीजवळील चिंचेचे झाड, तसेच नगरपरिषद कार्यालयासमोर वडाच्या फांद्या व पारंब्या थेट वीज तारांपर्यंत पोहोचल्या होत्या. या परिस्थितीमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.
नगरपरिषद आणि महावितरण प्रशासनाने तातडीने दखल घेत संयुक्त मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत संबंधित ठिकाणच्या धोकादायक फांद्या सुरक्षितपणे काढण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या या तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ टळला असून, नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
एकीकडे धोकादायक फांद्यांची छाटणी सुरू असतानाच, नगरपरिषदेने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपले प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. नुकत्याच राबवलेल्या वृक्षारोपण मोहिमेत मोठ्या प्रमाणावर देशी झाडांची लागवड करण्यात आली आहे. तसेच, या पावसाळी हंगामात आणखी शेकडो झाडे लावून ती जोपासण्याचा निर्धार नगरपरिषद प्रशासनाने व्यक्त केला आहे.