बारामती तालुका पोलिसांचे यश; मोका गुन्ह्यातील चार वर्षांपासून फरार आरोपी अटकेत
बारामती/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोका गुन्ह्यातील चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला बारामती तालुका पोलिसांनी अटक करण्यात यश मिळविले आहे.
बारामती तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 563/2022 मध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 120 (ब), 201, 143 तसेच आर्म अॅक्ट कलम 2 व 25 अन्वये गुन्हा दाखल असून, या गुन्ह्यातील आरोपी सोनू उर्फ ओंकार संजय जाधव (रा. कळंब, ता. इंदापूर, जि. पुणे) हा गुन्हा घडल्यापासून फरार होता.
दरम्यान, संबंधित आरोपी हा बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी एमआयडीसी परिसरात सापळा रचून शोधमोहीम राबविली. पेट्रोलिंगदरम्यान आरोपी सोनू उर्फ ओंकार संजय जाधव हा आढळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड आणि बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सदर कारवाईत ग्रेड पोलीस उपनिरीक्षक कल्याण शिंगाडे, सफौ सुरेंद्र वाघ, पोलीस हवालदार खारतोडे, एकसिंगे, आप्पा दराडे तसेच पोलीस शिपाई निलेश वाकळे आणि मनोज पवार यांनी सहभाग घेतला.