NEET पुनर्परीक्षेआधी टेलिग्रामवर बंदी; कॉपी आणि दिशाभूल रोखण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय
मार्मिक न्यूज नेटवर्क : नवी दिल्ली.
NEET-UG 2026 पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने टेलिग्राम अॅपवर 22 जूनपर्यंत तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेतील गैरप्रकार, प्रश्नपत्रिका गळतीच्या अफवा, बनावट संदेश आणि विद्यार्थ्यांची फसवणूक रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याचे राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) ने स्पष्ट केले आहे. तसेच टेलिग्रामवरील संदेश संपादन (एडिट ) सुविधा देखील काही काळासाठी बंद करण्यात आली आहे.

दरम्यान, या विषयावर यापूर्वी दिल्लीसह विविध राज्यांमध्ये आंदोलन कोक्रोच जनता पार्टीने आंदोलन छेडले होते. पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहारांबाबत आवाज उठवत देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि पारदर्शक चौकशीची मागणी केली होती. या आंदोलनादरम्यान त्यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा निर्माण केली होती.

या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना अभिजीत दिपके यांनी, “आमची लढाई संविधानिक मार्गाने सुरू आहे. यापूर्वीही आमच्यावर दबाव आणण्याचे आणि हल्ले करण्याचे प्रयत्न झाले, मात्र आम्ही लोकशाही आणि संविधानावर विश्वास ठेवतो. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आणि पारदर्शक व्यवस्थेसाठी आमचा संघर्ष पुढेही सुरू राहील,” असे ठामपणे सांगितले. NEET परीक्षेभोवती निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.