न्यूजपेपरमध्ये नाश्ता, स्वच्छतेचा बोजवारा; अमळनेरमध्ये अन्नसुरक्षेच्या नियमांना हरताळ!
अमळनेर :विक्की जाधव.
राज्यभर अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेबाबत कडक नियम लागू असताना अमळनेर शहरात मात्र अनेक हॉटेल व खाद्यपदार्थ विक्रेते खुलेआम वृत्तपत्राच्या कागदावर वडापाव, भजी, समोसे आणि इतर खाद्यपदार्थ देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शाईयुक्त न्यूजपेपरचा थेट संपर्क अन्नपदार्थांशी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची भावना व्यक्त होत आहे. मात्र संबंधित यंत्रणेकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नियम केवळ कागदोपत्रीच राहिल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

अन्नपदार्थ न्यूजपेपरमध्ये देऊ नयेत, तसेच स्वच्छतेच्या निकषांचे काटेकोर पालन करावे, याबाबत आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांनी स्पष्ट निर्देश व परिपत्रके जारी केली होती.

तरीही अमळनेरमधील अनेक हॉटेल, नाश्ता केंद्रे आणि फास्ट फूड विक्रेत्यांकडून या आदेशांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी स्वच्छतेचा अभाव, उघड्यावर ठेवलेले खाद्यपदार्थ आणि अस्वच्छ भांडी यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, अन्न व औषध प्रशासन तसेच स्थानिक प्रशासनाकडून अधूनमधून तपासणीचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात धडक कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांचे मनोबल वाढल्याची टीका होत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असताना संबंधित विभागाने तातडीने विशेष मोहीम राबवून दोषी व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.