सोनगाव व एमआयडीसी परिसरात अवैध हातभट्टी दारू व्यवसायावर पोलिसांची धडक कारवाई
बारामती/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात दारू निर्मितीचे रसायन जप्त केले. या कारवाईत तीन जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गुप्त माहितीच्या आधारे दिनांक १५ जून २०२६ रोजी दुपारी सोनगाव (ता. बारामती) येथे पोलिसांनी छापेमारी केली. यावेळी करिना अनिकेत भोसले हिच्या राहत्या घरामागील दारू अड्ड्यावर छापा टाकला असता अंदाजे २० हजार रुपये किमतीचे २०० लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन आढळून आले. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २८२/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (फ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर संजीवनी मजनू भोसले हिच्या घरामागील दारू अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. या ठिकाणी ४० हजार रुपये किमतीचे ४०० लिटर दारू निर्मितीचे रसायन जप्त करण्यात आले. तिच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक २८३/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (फ) अंतर्गत कारवाई करण्यात आली.
दरम्यान, दिनांक १४ जून २०२६ रोजी एमआयडीसी बारामती परिसरातील गोदरेज कंपनीजवळ एक व्यक्ती देशी दारूची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून नागेश प्रकाश चंदनशिवे (रा. दुर्गा टॉकीजजवळ, बारामती) याच्या ताब्यातून ५६० रुपये किमतीच्या ९० मिली क्षमतेच्या १४ सीलबंद देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक २८१/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मा. पोलीस अधीक्षक- पुणे ग्रामीण श्री संदीप गिल,मा.अपर पोलीस अधीक्षक बारामती-श्री गणेश बिरादारर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती- श्री सुदर्शन राठोड, पोलीस निरीक्षक बारामती तालुका पोलीस ठाणे- श्री नारायण पवार यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सपोनि/विक्रम पवार, पोउपनिरी/युवराज पाटील, सफौ/सुरेंद्र वाघ, पोहवा/खारतोडे, पोहवा/एकसिंगे, मपोहवा/राजश्री आटोळे, पोशि/निलेश वाकळे, पोशि/सौरभ तुपे गुन्हे प्रकटीकरन शाखेचे पोलीस अंमलदार व पोलीस ठाणे नेमणुकीतील पोलीस अंमलदार अशा वेगवेगळया पोलीस पथकाने सदरची कारवाई पार पाडली आहे.
पोलिसांच्या या कारवाईमुळे बारामती तालुक्यातील अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून अशा बेकायदेशीर धंद्यांविरोधातील कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.