“विठुरायाच्या दरबारात सर्व भाविक समान!” पंढरपूर मंदिरात VIP दर्शनाला पूर्णविराम.
मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव.
अधिक मासानिमित्त पंढरपूर येथे भाविकांची मोठी गर्दी उसळत असून विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने महत्त्वाचा निर्णय घेत VIP दर्शन व्यवस्था पूर्णपणे बंद केली आहे. त्यामुळे आता सर्व भाविकांना एकाच रांगेतून दर्शन घ्यावे लागणार असून “विठुरायाच्या दरबारात सर्वजण समान” हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला जात आहे. या निर्णयाचे वारकरी आणि सर्वसामान्य भाविकांकडून स्वागत करण्यात येत असून मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

नगरसेवक : सयोग ज्ञानेश्वर धनगर
अधिक मासामुळे राज्यासह देशभरातून लाखो भाविक पंढरीत दाखल होत आहेत. वाढती गर्दी लक्षात घेता दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि कोणत्याही भाविकावर अन्याय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाने VIP दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्व भाविकांना समान संधी मिळत असून विठ्ठलाच्या दर्शनासाठी भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. “पांडुरंगाच्या चरणी सर्वच भक्त समान” या भावनेला या निर्णयामुळे अधिक बळ मिळाल्याची प्रतिक्रिया भाविकांकडून व्यक्त होत आहे.