अमळनेर राममय! राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त शहरात विविध ठिकाणी भक्तीचा महोत्सव
अमळनेर : विक्की जाधव.
अयोध्या येथील प्रभु श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरात विविध ठिकाणी भक्तीमय वातावरणात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहरातील चौकाचौकांत, गल्लीबोळांत आणि बाजारपेठांमध्ये “जय श्रीराम”च्या गजरात नागरिकांनी मोठ्या उत्साहात या पावन दिवसाचे स्वागत केले. सकाळपासूनच शहरात भगवेमय वातावरण पाहायला मिळाले.

भगवा चौक येथे भगवा चौक मित्र मंडळाच्या वतीने प्रभु श्रीराम यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन व महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दीपप्रज्वलन, आरती आणि सामूहिक प्रार्थनेतून प्रभु श्रीरामाच्या चरणी भक्तिभाव अर्पण करण्यात आला. संपूर्ण परिसर भक्तीच्या ऊर्जेने भारावून गेला होता.

याचप्रमाणे अमळनेर शहरातील कोष्टी गल्ली येथेही प्रभु श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून उत्सव साजरा करण्यात आला. येथील नागरिकांनी स्वयंप्रेरणेने सहभाग घेत, धार्मिक भावना आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविले. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी या उत्सवात सहभाग नोंदवित श्रद्धा आणि संस्कारांची परंपरा जपली.

दरम्यान, शहरातील मुख्य बाजारपेठेत “भूतो न भविष्य” असा भव्य महाप्रसाद (भंडारा) आयोजित करण्यात आला होता. या भंडाऱ्याचा तब्बल १५ हजारांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या उपक्रमासाठी मुख्य बाजारपेठेतील अडत दुकानदार, किरकोळ भाजी विक्रेते तसेच व्यापारी वर्गाने मोलाचे सहकार्य केले. सामाजिक सलोखा, भक्ती आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम या निमित्ताने अमळनेरमध्ये अनुभवायला मिळाला.