UDID प्रमाणपत्रांच्या नावाखाली गैरप्रकार? अमळनेरमध्ये संशयाची साखळी उघड
अमळनेर : विक्की जाधव.
तालुक्यात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या UDID (Unique Disability ID) प्रमाणपत्र प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शासनाच्या आदेशांना डावलून काही ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने दाखले देण्यात आल्याची बाब समोर आली असून, यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. विशेष म्हणजे, दिव्यांगांच्या हक्कांशी संबंधित असलेल्या या प्रक्रियेत हलगर्जीपणा झाल्यास खऱ्या गरजूवर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्य शासनाच्या दिव्यांग सशक्तीकरण विभागाने यापूर्वीच UDID प्रमाणपत्रांसंदर्भात काटेकोर मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. वैद्यकीय तपासणी, अधिकृत समितीची शिफारस आणि ऑनलाईन नोंदणी या सर्व टप्प्यांचे पालन बंधनकारक असताना, अमळनेरमध्ये काही प्रकरणांमध्ये या नियमांना हरताळ फासण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे “प्रमाणपत्रे खरी की खोटी?” असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
या संपूर्ण प्रकाराची लवकरच सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून मिळाले आहेत. दोषी आढळणाऱ्या अधिकारी, कर्मचारी किंवा मध्यस्थांवर कठोर कारवाई होणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे अमळनेरमध्ये खळबळ उडाली असून, दिव्यांगांच्या न्यायासाठी प्रशासनाने पारदर्शक आणि निःपक्षपाती भूमिका घ्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.