बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ : तिसऱ्या टप्प्याचा बारामती येथे समारोप, कॅमेरून स्कॉटचा विजय
बारामती/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याचा बारामती येथे उत्साहात समारोप झाला. या आव्हानात्मक टप्प्यात चीनच्या ली निंग स्टार संघाच्या कॅमेरून निकोलस स्कॉट याने बाजी मारली, तर एकूण क्रमवारीत ल्यूक मुडग्वे याने ‘पिवळी जर्सी’वरील वर्चस्व कायम राखले.
उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बारामती येथील विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय परिसरात विजेत्या सायकलपटूंना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ‘बजाज पुणे ग्रँड टूर’मुळे पुणे जिल्ह्यात अडथळे विरहित व दर्जेदार रस्त्यांची निर्मिती झाली असून वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होत आहे. या स्पर्धेमुळे पुणे जिल्ह्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण होत असून पर्यटन व क्रीडा विकासाला चालना मिळत आहे.
🔴तिसरा टप्पा : कौशल्य आणि सहनशक्तीची कसोटी
१३७ किलोमीटरच्या या तिसऱ्या टप्प्याला सासवड येथील चंदन टेकडीवरून दुपारी १२:३० वाजता सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून शर्यतीचा शुभारंभ केला. पश्चिम घाटाच्या प्रवेशद्वाराजवळील चढ-उतार, वाऱ्याची प्रतिकूल दिशा आणि वळणदार रस्ते यामुळे हा टप्पा अत्यंत आव्हानात्मक ठरला.
कॅमेरून स्कॉटने हा टप्पा ३ तास ०४ मिनिटे १३ सेकंदांत पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकावला. स्पेनच्या बुर्गोस बुर्पेललेट बीएच संघाचा जॉर्जिओस बुग्लास दुसऱ्या, तर बेल्जियमच्या टार्टेलेटो-आयसोरेक्स संघाचा तिमोथी ड्युपॉन्ट तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
पहिल्या दोन टप्प्यांचा विजेता ल्यूक मुडग्वे सहाव्या स्थानावर राहिला असला, तरी त्याने एकूण क्रमवारीत आघाडी कायम ठेवत ‘यलो जर्सी’ आणि ‘बेस्ट स्प्रिंटर’साठीची हिरवी जर्सी आपल्याकडेच राखली. तीन टप्प्यांनंतर ल्यूकचा एकूण वेळ ७ तास ३६ मिनिटे १० सेकंद असा आहे.
🟤नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
स्पर्धेच्या मार्गालगत ग्रामीण व शहरी भागात नागरिक, महिला, शेतकरी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन देत होते. त्यामुळे संपूर्ण परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले होते. सायकलपटूंनीही मार्गांची आंतरराष्ट्रीय दर्जाची गुणवत्ता आणि नागरिकांच्या उत्साहाचे विशेष कौतुक केले.
🟢शेवटचा टप्पा
स्पर्धेचा चौथा व अंतिम टप्पा ‘पुणे प्राईड लूप’ शुक्रवारी(दि.23 जानेवारी)होणार असून ९५ किलोमीटरचा हा टप्पा शनिवारवाडा, बालेवाडी ते जे. एम. रोड या ऐतिहासिक व आधुनिक भागांतून जाणार आहे. सेकंदांच्या फरकामुळे अंतिम टप्पा अत्यंत रोमांचक ठरण्याची शक्यता आहे.

🔶महत्त्वाच्या जर्सी विजेते
यलो जर्सी (एकूण विजेता) : ल्यूक मुडग्वे
ग्रीन जर्सी (बेस्ट स्प्रिंटर) : जॉर्जिओस बुग्लास
पोल्का डॉट जर्सी (किंग ऑफ माउंटेन्स) : क्लेमेंट अलेनो
ऑरेंज जर्सी (बेस्ट एशियन रायडर) : जंबालजाम्तस सैनबायर
व्हाइट जर्सी (बेस्ट यंग रायडर) : व्हिएगो टिजसेन
ब्लू जर्सी (भारताचा सर्वोत्तम खेळाडू) : हर्षवीर सिंग सेखॉन
ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत असून ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ने पुणे जिल्ह्याला जागतिक क्रीडा नकाशावर मानाचे स्थान मिळवून दिले आहे.