देश-विदेशातील सायकलपटूंची धडाकेबाज शर्यत : २२ जानेवारीला सासवड ते बारामती ‘बजाज पुणे ग्रँड टूर’चा तिसरा टप्पा

बारामती/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
‘बजाज पुणे ग्रँड टूर–२०२६’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेअंतर्गत तिसऱ्या टप्प्याचे आयोजन गुरुवार, दि. २२ जानेवारी २०२६ रोजी सासवड ते बारामती दरम्यान करण्यात आले आहे. या टप्प्याची सुरुवात दुपारी १२.३० वाजता सासवड येथील नगरपरिषद, चंदन टेकडी येथून होणार असून बारामती येथील विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय येथे या टप्प्याचा समारोप होणार आहे.
या टप्प्यातून देश-विदेशातील नामांकित सायकलपटू सासवड व बारामती तालुक्यातील विविध भागांतून स्पर्धा करणार असून नागरिकांना थरारक सायकलिंग कौशल्य पाहण्याची संधी मिळणार आहे. तिसऱ्या टप्प्याचे एकूण अंतर १३७.७ किलोमीटर आहे.
स्पर्धा यशस्वी व सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून मार्गावर संपूर्ण स्वच्छता, वाहतूक नियंत्रण व सुरक्षेच्या दृष्टीने सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक, गृहनिर्माण सोसायट्या, गणेश मंडळांचे पदाधिकारी, महाविद्यालये, राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)चे विद्यार्थी तसेच विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी यांनी प्रशासनासोबत समन्वय साधत सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
असा असेल तिसऱ्या टप्प्याचा मार्ग
सासवड येथून स्पर्धेचा प्रारंभ होऊन सासवड, सुपे, पानवडी घाट, काळदरी (बोरी फाटा), मांढर, माहूर, परींचे, हरणी, वाल्हे, पिसुर्टी, नीरा, ब्राह्मणधरा, मुर्टी, मोरगाव, तरडोली, जळगाव क. प., कऱ्हावागज, खंडोबानगर, पिंपळी, लिमटेक, कन्हेरी, रुई रोड सावळ, वंजारवाडी मार्गे विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, बारामती येथे या टप्प्याचा समारोप होणार आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मार्गावर गर्दी न करता, वाहतूक नियमांचे पालन करून स्पर्धेला सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.